विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत पराभव स्विकारला आहे. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत न्यूझीलंडने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. व्हाईटवॉश टाळण्यासाठी भारताला मंगळवारी होणाऱ्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीच्या मते यंदाच्या वर्षात वन-डे क्रिकेटला टी-२० आणि कसोटीइतकं महत्व नाहीये.
अवश्य वाचा – विराट कोहलीकडे महान खेळाडू बनण्याची क्षमता !
“पहिले दोन वन-डे सामने खरच रंगतदार झाले. आम्ही ज्या पद्धतीने अखेरपर्यंत झुंज दिली हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. पहिल्या सत्रात आमच्याकडून काही चुका झाल्या, पण सैनी आणि जाडेजाने चांगली झुंज दिली. पण माझ्या मते यंदाच्या वर्षात टी-२० आणि कसोटी क्रिकेटला अधिक महत्व आहे…वन-डे क्रिकेटला नाही.” विराट कोहली दुसऱ्या वन-डे सामन्यानंतर बोलत होता.
यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेआधी भारतीय संघाला सरावासाठी फार कमी आंतरराष्ट्रीय टी-२० सामने मिळणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस सुरु होणारं आयपीएल हे भारतीय खेळाडूंसाठी सरावाचं एक चांगलं माध्यम आहे. मात्र या स्पर्धेत खेळाडू दुखापतग्रस्त होणार नाहीत, याची काळजी संघ व्यवस्थापनाला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये भारतीय संघ कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.