कोल्हापूर : खो-खो हा शब्द उच्चारायचा कसा इथून सुरुवात! पण अवघ्या काही महिन्यांत त्यांनी केवळ हा खेळ समजून घेतला नाही, तर त्यात प्रावीण्य मिळवले. आज ज्या देशाला हा खेळ माहित नव्हता तो देश पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत सहभागी झाला आहे. ही अविश्वसनीय गोष्ट आहे ऑस्ट्रेलिया संघाची आणि त्यामागील ‘द्रोणाचार्य’ कोल्हापुरातील एक तरूण ओजस कुलकर्णी याची.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ सहभागी झाला आहे. या संघाचा कर्णधार आणि मार्गदर्शक ओजस कुलकर्णी आहे. ‘लोकसत्ता’शी बोलताना ओजसने ऑस्ट्रेलियाचा या खेळातील प्रवास मांडला.

ओजस स्वत: खो-खो खेळाडू. त्याचे वडील किरण कुलकर्णी हे इचलकरंजीच्या जयहिंद मंडळाचे गाजलेले खो-खो खेळाडू. येथील डीकेईटी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर ओजसने उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाची वाट धरली. पुढे तो ‘नासा’मध्ये शास्त्रज्ञ म्हणून रूजू झाला. यातूनच तो नासाच्या संयुक्त संशोधन प्रकल्पाचा प्रमुख म्हणून ‘ऑस्ट्रेलिया स्पेस एजन्सी’मध्ये काम पाहात आहे.

हेही वाचा >>> Wankhede Stadium : क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडेवर भारताचा कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या

उच्च शिक्षण ते नोकरी या दरम्यान ऑस्ट्रेलियाशी तयार झालेल्या नात्यात ओजसने येथे खो-खो खेळ रुजवण्यास सुरूवात केली. त्यातून मेलबर्न, सिडनी, कॅनबेरा येथे स्थानिक संघ तयार केले. पोलो या खेळातील आयते खांब वापरून सराव सुरू झाला. तरुणांच्या बरोबरीने तरुणींच्या संघाची बांधणी करण्यात आली. प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अर्थातच ओजसची. हा खेळ आणि खेळाडू तयार होऊ लागल्यावर त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आणि आज त्याला यात यश आले आहे. प्रवासाची सुरुवात तशी खडतर होती. खो-खो हा शब्दच ज्या ऑस्ट्रेलियन लोकांच्या गावी नव्हता, तिथे हा खेळ रुजवणे, विकसित करण्याचे आव्हान होते. मन आणि शरीर या खेळासाठी पूरक बनवून घेणे प्रारंभी कठीण गेले, पण यथावकाश सारे आवश्यकतेनुसार वळत-शिकत गेले.

दोन-तीन महिन्यांत ३०-३५ जणांचा हा संघ चांगलाच सरावला. चित्रफितीच्या आधारे तांत्रिक बाबी खेळाडूंनी समजून घेतल्या. ध्रुव, पाठलाग करणारा, धावणारा, वेगवेगळ्या ओळी, चौरस खो, सुरुवातीची अवस्था, लॉबी, मुक्त क्षेत्र या तांत्रिक बाबींबरोबर वेग, चपळता आणि रणनीती याचे धडे शिकवले. उत्तम तयारी झाल्याने स्थानिक स्पर्धांमध्ये खेळाडूंची चमक दिसून येत गेली.

यातून पुढे ‘खो-खो फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेलिया’ या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेची बांधणी झाली. निक दमजानोव्स्की (अध्यक्ष), मॉ स्कवा (उपाध्यक्ष), नसिराम ग्रेवाल (सचिव), राज सुरा (खजिनदार), ओजस कुलकर्णी, वर्षा टेंबे, गौरव कांडपाल (तिघे सदस्य) अशी कार्यकारिणी आहे.

ज्या देशाला हा खेळच माहिती नव्हता तिथे त्यांनी या खेळाबद्दल उत्सुकता दाखवली. चिकाटीने हा खेळ केवळ शिकून घेतला नाही तर त्यात त्यांनी उंची दाखवली आहे. भारतात होत असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. ही संधी आमच्या संघटनेसाठी आणि ऑस्ट्रेलियातील खो-खोच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची गुणवत्ता जागतिक स्तरावर दाखवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. – ओजस कुलकर्णी, ऑस्ट्रेलिया संघ कर्णधार, मार्गदर्शक.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kho from australian team zws