Suryakumar Yadav On Rohit Sharma: भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने टी –२० आणि कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान त्याचा सहखेळाडू आणि भारतीय टी –२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने रोहित शर्माबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
भारतीय संघाचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने नवीन पॉडकास्ट सुरू केला आहे. ज्यात तो भारतीय खेळाडूंची मुलाखत घेतो. यावेळी सूर्यकुमार यादव आणि त्याच्या पत्नीने हरभजन सिंगच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये हरभजन सिंह म्हणाला की, मी एका खेळाडूचं नाव घेईल. त्या खेळाडूचं नाव घेताच तुझ्या मनात जो शब्द येईल तो शब्द सांगायचा. हरभजनने रोहित शर्माचं नाव घेताच त्याने पत्नी देविशा शेट्टीकडे पाहिलं आणि विसरभोळा असं उत्तर दिलं. सूर्यकुमार यादवने दिलेलं हे उत्तर ऐकून पत्नी देविशा शेट्टीलाही हसू आवरलं नाही.
रोहित शर्माचा कसोटी आणि टी –२० क्रिकेटला रामराम
रोहित शर्मा हा गोष्टी विसरण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो कधी पासपोर्ट तर कधी काय बोलायचं आहे हेच विसरला आहे. विराट कोहलीनेही एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की, रोहितने अनेकदा गोष्टी विसरल्या आहेत. आयसीसी टी –२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अंतिम सामना झाल्यानंतर रोहित शर्माने टी –२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताचा इंग्लंड दौऱ्या सुरू होण्यापूर्वी रोहितने कसोटी क्रिकेटलाही रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे.
रोहित शर्माचा रेकॉर्ड
तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्माचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने ४३०१ धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये १११६८ धावा केल्या आहेत. तर टी –२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ४२३१ धावा केल्या आहेत. रोहितने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ४९ शतकं झळकावली आहेत. कर्णधार म्हणूनही रोहितचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. रोहितने भारतीय संघाला २०२४ टी –२० वर्ल्डकप आणि २०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.