PAK vs BAN, How Pakistan Can Reach Semi Finals: बाबर आझम आणि संघ २०२३ च्या विश्वचषकासाठी विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये होते. सध्याच्या घडीचे अव्वल फलंदाज आणि आक्रमक गोलंदाज गाठीशी असल्यामुळे पाकिस्तान भारतात होणाऱ्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करून दाखवेल असं वाटत होतं पण पहिल्या दोन विजयांनंतर पाकिस्तानची नाव बुडतच गेली. अफगाणिस्तान समोर गुडघे टेकल्यावर पाकिस्तानच्या संघाची मोहीम विश्वचषकात संपुष्टातच येईल असे दिसत होते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात पराभूत होऊनही पाकिस्तानने दिलेली कडवी झुंज ही कदाचित त्यांचं स्पर्धेतील पुनरागमनाची सुरुवात ठरू शकते. आज पाकिस्तान व बांगलादेश सामन्याच्या नंतर पॉईंटटेबलमध्ये होणारा बदल हा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
पाकिस्तान आज मंगळवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध व ४ नोव्हेंबरला २०१९ च्या उपविजेत्या न्यूझीलंडविरुद्ध लढणार आहे. ११ नोव्हेंबरला पाकिस्तान मागील विश्वचषकातील चॅम्पियन इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडचे आव्हान सोडल्यास अन्य दोन सामने पाकिस्तानसाठी मोक्याची संधी ठरू शकतात. यामध्ये धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास पाकिस्तान नेट रन रेटच्या स्पर्धेत तरी आघाडीवर येऊ शकतं. पण हे तिन्ही सामने जिंकूनही पाकिस्तानसाठी उपांत्य फेरी गाठण्याची वाट काही सोपी नाही. मुख्य म्हणजे पाकिस्तानचे स्पर्धेतील अस्तित्व हे स्वतःइतकेच इतरांच्या खेळावर अवलंबून असणार आहे.
.. तर पाकिस्तान सेमी फायनलसाठी पात्र ठरणार!
पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी उर्वरित तीनही सामने जिंकून त्यांच्या खात्यात १० पॉईंट्स जमा करावे लागणार आहेत.
जर ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या पुढील तिन्ही सामन्यांमध्ये म्हणजेच अफगाणिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध पराभूत झाला आणि श्रीलंकेचा संघ भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांपैकी दोन सामने हरला तर पाकिस्तानला कदाचित थोडी मदत होऊ शकते.
यामुळे ऑस्ट्रेलियाचे आठ गुण होतील आणि श्रीलंकेला सहा गुणांपेक्षा जास्त पॉईंट्स मिळणार नाही. याशिवाय न्यूझीलंड जर तीन सामन्यांपैकी किमान दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला तर ते ही ८ पॉईंट्स पेक्षा पुढे जाणार नाहीत.
हे ही वाचा<< IND vs ENG Match Point: विराट कोहली शून्यावर बाद! ड्रेसिंग रूममध्ये रागात केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video व्हायरल
दरम्यान, मंगळवारी पुण्यात श्रीलंकेच्या विरुद्ध अफगाणिस्तानच्या शानदार विजयाने पाकिस्तानसाठी परिस्थिती कठीण झाली आहे. आता पाकिस्तानला स्पर्धेत पुढे जाण्यासाठी अफगाणिस्तानचा नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.