West Indies Beat Pakistan by 202 Runs: पाकिस्तान संघाचा वेस्ट इंडिजने तिसऱ्या वनडे सामन्यात दारूण पराभव केला आहे. शे होपच्या नेतृत्त्वाखालील वेस्ट इंडिज संघाने पाकिस्तानचा तब्बल २०२ धावांनी पराभव केला, यासह वेस्ट इंडिजने २-१ ने तीन सामन्यांची वनडे मालिका आपल्या नावे केली आहे.
३४ वर्षांनंतर वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्यात यश मिळवले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने शे होपच्या शतकाच्या जोरावर ६ गडी गमावून २९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ ९२ धावांवर ऑलआउट झाला.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५० षटकांत ६ गडी गमावून २९४ धावा केल्या. मालिकेच्या निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजला इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात कर्णधार शे होपने मोठी भूमिका बजावली. त्याने उत्कृष्ट शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. शे होपने या सामन्यात १८वं वनडे शतक झळकावलं.
शे होपने ९४ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १२० धावा केल्या. कर्णधार होपच्या स्फोटक फलंदाजीमुळे, पहिल्या ४२ षटकांत ६ गडी बाद १८५ धावा करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने शेवटच्या ८ षटकांत एकही विकेट न गमावता १०९ धावा जोडल्या.
एकट्या शे होपच्या १०० धावा अन् पाकिस्तान ९२ धावांवर ऑलआऊट
मालिकेच्या निर्णायक सामन्यात विजयासाठी पाकिस्तानसमोर २९५ धावांचे लक्ष्य होते. पण, वेस्ट इंडिजविरुद्ध धावांचा पाठलाग करण्यात पाकिस्तानचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. पाकिस्तानच्या ३ फलंदाजांना भोपळादेखील फोडता आला नाही. बाबर आझम ९ धावा करत बाद झाला. तर मोहम्मद रिझवानने चेंडू सोडला आणि तो बाद झाला. याशिवाय सलमान आघाने ३० धावांची सर्वात मोठी खेळी केली. अवघ्या ९२ धावांवर संपूर्ण पाकिस्तानचा संघ सर्वबाद झाला. परिणामी, वेस्ट इंडिजने २०२ धावांनी सामना जिंकला, जो धावांच्या बाबतीत पाकिस्तानवरील त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. त्यांनी २०१५ मध्ये क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात १५० धावांनी विजय मिळवण्याचा विक्रम मोडला आहे.
वेस्ट इंडिजने वनडे क्रिकेटमध्ये चौथ्यांदा २०० पेक्षा अधिक धावांनी एखाद्या संघावर विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेडन सील्सने भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. सील्सने पाकिस्तानच्या निम्म्या संघाला माघारी धाडलं. त्याने ७.२ षटकांत १८ धावा देत ६ बळी घेतले, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामन्यातील विजयासह मालिकाही आपल्या नावे केली. यासह वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा ३४ वर्षांनी वनडे मालिकेत पराभव केला आहे. १९९१ नंतर वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्धची पहिली एकदिवसीय मालिका जिंकली आहे.