India and New Zealand Qualify for Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असलेल्या पाकिस्तानचा संघ स्पर्धेच्या अवघ्या दिवसांतच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील सहावा सामना न्यूझीलंडविरूद्ध बांगलादेश यांच्यात खेळवला गेला. न्यूझीलंड संघाने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव केला. पण न्यूझीलंडच्या या विजयासह पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर झाला. तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटातून भारत आणि न्यूझीलंड हे संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. भारत आणि न्यूझीलंडने सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत थेट सेमीफायनल गाठली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तब्बल ३० वर्षांनंतर पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. त्यानंतर थेट आता २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते. पाकिस्तानने आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळावे यासाठी बरेच प्रयत्न केले होते. पण घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांचा पाकिस्तानने बिलकुल फायदा करून घेतला नाही आणि पहिल्या दोन सामन्यात पराभूत होत स्पर्धेतील आपले आव्हान संपुष्टात आणले.

इतकंच नव्हे तर पाकिस्तानचा संघ २०१७ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ होता, म्हणजेच या स्पर्धेतील गतविजेता संघ होता. पण पाकिस्तान आता गट सामन्यांतूनच बाहेर झाला आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तर दुसऱ्या सामन्यात भारताकडून ६ विकेट्स आणि ४५ चेंडू राखून पराभव पत्करावा लागला होता. सलग दोन सामन्यांमधील पराभवाने आता पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ गट सामन्यांमधूनच स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटात कोणते संघ?

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या ब गटात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. या सर्व संघांनी आतापर्यंत १-१ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ विजयी झाले आहेत. त्याचबरोबर इंग्लंड आणि अफगाणिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २५ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. आता कोणता संघ सलग दुसरा विजय मिळवतो यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.

न्यूझीलंड वि. बांगलादेश सामन्याचा लेखाजोखा

बांगलादेश न्यूझीलंड सामन्याची किवी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या संघाने न्यूझीलंडविरूद्ध चांगली सुरूवात करत किवींना धक्का दिला. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत बांगलादेशला बॅकफूटवर टाकले. बांगलादेशने ४५ धावांवर पहिली विकेट गमावली आणि त्यानंतर ठराविक अंतरासह संघाने विकेट्स गमावल्याचा फटका बसला. न्यूझीलंडकडून कर्णझार नझमुल शांतोने ९ चौकारांसह ७७ धावांची खेळी केली तर जाकेर अलीने ४५ धावांची आणि रिशाद हुसैनने २६ धावांची तर तन्झीद हसनने २४ धावांची खेळी करत संघाला २३६ धावांपर्यंत नेले.

न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेलने आपल्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेशी फलंदाजांना अडकवले आणि १० षटकांत २६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तर विल्यम ओरूकने २ विकेट्स आणि हेन्री, जेमीसनने १-१ विकेट घेतली.

बांगलादेशने दिलेल्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात काही खास झाली नाही. त्यांनी केवळ ७२ धावांत ३ विकेट गमावल्या. यानंतर रचिन रवींद्रने शानदार फलंदाजी करत शतक झळकावून आपल्या संघाला विजयाकडे नेले. रचिन आणि कॉन्वे यांनी मॅचविनिंग भागीदारी रचली. न्यूझीलंडने हे लक्ष्य ४६.१ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले.

कॉन्वेने ३० धावा केल्या, तर विल्यसमन ५ धावा करत बाद झाला. यानंतर रचिन रवींद्र जो चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना खेळत होता, त्याने १०५ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकारासह ११२ धावा केल्या. तर टॉम लॅथमने ५ धावा केल्या, तर फिलिप्सने २१ आणि ब्रेसवेलने ११ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan is out of champions trophy 2025 and india and new zealand in semi final as nz beat ban by 6 wickets bdg