वृत्तसंस्था, दुबई

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवच्या हस्तांदोलन नकाराचे खापर सामनाधिकाऱ्यांवर फोडून स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा प्रयत्न बुधवारी फसला. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना बदलणार नाही, अशी परखड भूमिका घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने, पायक्रॉफ्ट यांनी माफी मागावी ही पाकिस्तानची भूमिका मात्र मान्य केली. त्यामुळे सामन्यापूर्वी जवळपास चार तास रंगलेल्या बहिष्कारनाट्यावर पडदा पडला.

नेमक्या कोणत्या कारणास्तव पाकिस्तानने बहिष्कारास्त्र म्यान केले आणि ते स्पर्धेत खेळण्यास राजी झाले हा पुढील काही दिवस चर्चेचा विषय मात्र राहील. आयसीसीच्या खमकेपणासमोर पीसीबीचा ताठा उपयोगी पडला नाही, अशीच या प्रकरणाशी संबंधितांची धारणा आहे.

सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांनी हस्तांदोलन करू नये असा सल्ला देणारे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी अधिकाराची मर्यादा ओलांडली, त्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी पाकिस्तान क्रिकेट मंडळाची मागणी होती. बुधवारी संयुक्त अमिरातीविरुद्धच्या सामन्याच्या काही तास आधीपर्यंत पीसीबी या मागणीवर अडून बसले. मात्र कोणत्याही परिस्थितीत पायक्रॉफ्ट यांना हटवणार अशी स्पष्ट भूमिका आयसीसीने घेतली. त्यामुळे तडजोडीची शक्यता मावळली होती आणि सामना यूएईला बहाल करून स्पर्धेवरच बहिष्कार घालण्याच्या निर्णयाप्रत पीसीबी आले होते. अखेर शेवटच्या दोन तासांमध्ये चक्रे फिरली आणि पाकिस्तान खेळण्यास राजी झाले. या नाराजीनाट्यामुळे सामना मात्र एक तास उशिराने सुरू झाला.

पायक्रॉफ्ट यांनी गैरसमजातून असे घडल्याचे कबूल केले आहे. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे, असे स्पष्टीकरण पीसीबीतर्फे समाजमाध्यमांवर देण्यात आले.

तरच पायक्रॉफ्ट यांची चौकशी

‘पीसीबी’च्या चौकशी संदर्भातील विधानावर ‘आयसीसी’च्या सूत्राने पायक्रॉफ्ट यांनी चुकीच्या संवादासाठी माफी मागितली आहे. त्यांच्या चौकशीचे आश्वासन दिलेले नाही, असे सांगितले. ‘पीसीबी’ पायक्रॉफ्ट यांची चूक काय होती याचे पुरावे सादर करेल, तेव्हाच त्यांची चौकशी केली जाईल, असेही या सूत्राने स्पष्ट केले.