पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे स्पष्टीकरण
भारतात पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सहभागाबाबतचा निर्णय सरकार आठवडाभरात घेईल, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) दिली.
‘‘क्रिकेट संघाने विश्वचषक स्पध्रेत सहभाग घेऊ की नये, याबाबतचा निर्णय सरकार आठवडय़ाच्या आत घेईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. सरकारने आम्हाला खेळण्यास हिरवा कंदील दाखवला, तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. खेळाडू आणि साहाय्यकांसाठी व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे,’’ असे पीसीबीचे प्रसारमाध्यम संचालक अमजद हुसेन यांनी दिली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी बुधवारी या स्पध्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला सुरक्षा पुरवली जाईल, अशी खात्री दिली होती.
तत्पूर्वी, सरकारने परवानगी नाकारल्यास पाकिस्तानच्या लढती तटस्थ ठिकाणी खेळवण्याची विनंती पीसीबीने केली होती. ‘‘सद्य:स्थिती पाहता तटस्थ ठिकाणी खेळण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. प्रथम आम्ही सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा
पाहत आहोत,’’ असे हुसेन
म्हणाले.
विश्वचषक स्पध्रेच्या वेळापत्रकानुसार पाकिस्तानचा पहिला मुकाबला १६ मार्चला कोलकाता येथे, तर १९ मार्चला धरमशाला येथे भारताविरुद्ध सामना होणार आहे. त्यानंतर २२ आणि २५ मार्चला मोहालीत अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाशी पाकिस्तानचे सामने होणार आहेत. पाकिस्तानमधील संवेदनशील परिस्थिती पाहता आमच्या वाहतुकीची माहिती देऊ शकत नाही. ती माहिती गुलदस्त्यात ठेवली जाईल, असे हुसेन यांनी सांगितले.