कोणतेही कारण न देता संघातून तडकाफडकी काढून टाकल्यावर इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसन कमालीचा निराश झाला आहे. कारण त्याला संघातून हकालपट्टीची कारणे मिळाली नाहीत. एका मुलाखतीमध्ये त्याला याबाबत प्रश्न विचारल्यावर पीटरसनने इंग्लंडच्या संस्कृतीला ‘गुंडगिरी’ प्रवृत्ती म्हणत फटकारले.
‘‘२०१३-१४च्या अ‍ॅशेस मालिकेनंतर मला कोणतेही कारण न देता संघाबाहेर काढण्यात आले. या मालिकेमध्ये मी चांगल्या धावा केल्या होत्या, पण या धावा स्वार्थापोटी केल्या असल्याचे मला सांगण्यात आले. या दौऱ्यात संघामध्ये भीतीचे सावट पसरले होते. वाढत्या दडपणामुळे ब्रिस्बेनच्या कसोटीनंतर जोनाथन ट्रॉट संघाबाहेर पडला होता. त्या वेळी मी प्रशिक्षक अँडी फ्लॉवरला सांगितले की, मी कोणत्याही दहशतीला भीत नाही. हे सारे अँडीला आवडले नाही, मला माझी कोणतीही बाजू न मांडू देता गुंडगिरी करत त्यांनी मला संघाबाहेर काढले,’’ असे पीटरसन म्हणाला.