टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. भारतानं पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक प्रकारात पदक पटकावलं आहे. नीरजने सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजला फोन करून त्याचं अभिनंदन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रासोबत फोनवर बातचीत केली. नरेंद्र मोदी म्हणाले, “नीरज चोप्राशी आताचं बोलणं झालं आहे. त्याला सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि दृढतेचे कौतुक केले. जे टोक्यो २०२० दरम्यान पूर्ण प्रदर्शनात होते. नीरज उत्कृष्ट खेळ आणि खेळाडू वृत्तीचा परिचय देतो. त्याला भावी आयुष्यातील कार्यासाठी शुभेच्छा.”
#WATCH | During a phone call, PM Narendra Modi congratulates javelin thrower Neeraj Chopra who won #Gold medal at #TokyoOlympics today pic.twitter.com/rGwiTJmx4U
— ANI (@ANI) August 7, 2021
- पंतप्रधान नरेंद्र मोदी: नमस्ते
- नीरज: नमस्ते सर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी: तुला खूप खूप शुभेच्छा
- नीरज: धन्यवाद सर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी: ऑलिम्पिक समारोपाच्या दिशेने जात आहे आणि तू देशाला खूश केलं आहेस.
- नीरज: भारतासाठी मला काहीतरी करायचं होतं. मला सुवर्ण जिंकायचं होतं. मला सर्व भारतीयांचा पाठिंबा होता. तुम्ही सुद्धा स्पर्धा बघत होतात. खूप चांगलं वाटलं.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी: पानीपतने पाणी दाखवलं.
- नीरज: हाहाहाहा, सर्वांचे आशीर्वाद कामी आले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी: ऑलिम्पिक एक वर्ष उशिराने झाल्याने एक वर्ष अधिक मेहनत घ्यावी लागली. करोनामुळे अनेक संकटं आली. मध्यंतरी तुला दुखापतही झाली होती. त्यावर मात करत तू चांगली कामगिरी केली. हे सर्व तुझ्या मेहनतीचं फळ आहे.
- नीरज: हो सर, दुखापत झाल्याने कसं कमबॅक करायचं हा प्रश्न होता
- पंतप्रधान नरेंद्र मोदी: ज्या दिवशी तू जाणार होता आणि माझी तुझ्यासोबत चर्चा झाली. मी बघितली की तुझ्या चेहऱ्यावर एकदम आत्मविश्वास होता. तुझ्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवत होता. तुझ्यावर कोणतंच दडपण दिसलं नाही. विशेष म्हणजे आनंद घेत खेळत होता.
- नीरज: मी माझं १०० टक्के दिलं आणि देशासाठी सुवर्ण पदक पटकावलं.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी: तु देशाचं नाव केलं आहेस. तुझ्यामुळे तरुणांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळेल. टोक्योत आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
- नीरज: नक्कीच आपला भारत भविष्यात क्रीडाक्षेत्रात चांगली कामगिरी करेल
- पंतप्रधान नरेंद्र मोदी: तू तर सैनिक आहेस, आणखी मुलांना घडवशील यात शंका नाही.
- नीरज: नक्कीच
- पंतप्रधान नरेंद्र मोदी: तुझ्या आई वडिलांना माझ्याकडून नमस्कार सांग, हा खूपच आनंदाचा क्षण आहे. राधाकिशनला सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा दे.
- नीरज: हो नक्की
- पंतप्रधान नरेंद्र मोदी: त्यांनी पण तुझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. १५ ऑगस्टला आपण भेटतोय.
- नीरज: नक्की
- पंतप्रधान नरेंद्र मोदी: खूप खूप शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना भेटणार आहेत. या कार्यक्रमामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत १३० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या १२७ खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान मोदी प्रत्येक खेळाडूची भेट घेणार असून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.