आयपीएलमधील फिक्सिंगचा वाद आता चिघळू लागला असून समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनीही शुक्रवारी या वादावर आपले सडेतोड मत मांडले आहे. खेळाच्या हितासाठी राजकारण्यांनी आता खेळांपासून दूर राहायला हवे, असे मुलायमसिंग म्हणाले.
देशात आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंगचा वाद चांगलाच उफाळून आला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मुलायमसिंग म्हणाले. फिक्सिंगच्या मुद्दय़ावर ते म्हणाले की, ‘‘राजकारण्यांनी राजकारण करावे, तर खेळाडूंनी त्यांच्या खेळावरच लक्ष द्यावे.’’
‘‘क्रिकेटसारख्या परकीय खेळामुळे स्वदेशी खेळांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. क्रिकेट या खेळाला माझा कायम विरोध राहिला असून क्रिकेटसारख्या परदेशी खेळाला उचलून धरण्यापेक्षा स्थानिक खेळांना प्राधान्य आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे,’’ असे ते म्हणाले.