पुण्यावर मात; आज नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सविरुद्ध अंतिम लढत

प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) शनिवारी अखेरच्या फेरीपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक उपांत्य सामन्यात गतविजेत्या बेंगळूरु रॅप्टर्स संघाने पुणे ७ एसर्स संघावर ४-३ अशी सरशी साधून सलग दुसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने कूच केली. रविवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सचे आव्हान असेल.

गचीबोवली बंदिस्त क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात पुण्यासाठी चिराग शेट्टी आणि हेंड्रा सेटियावान यांनी पहिली लढत जिंकली. हा ‘ट्रम्प सामना’ असल्याने त्यांनी २-० अशी आघाडी घेतली. परंतु ब्राइस लेव्हेर्डेझने मिथुन मंजुनाथला १५-१४, ९-१५, १५-६ असे नमवून बेंगळूरुसाठी पुनरागमनाची संधी निर्माण केली. तिसऱ्या सामन्यामध्ये कजुमसा सकाईने बी. साईप्रणीतला १५-११, १५-१३ असा पराभवाचा धक्का देत पुण्याची आघाडी ३-१ अशी वाढवली. परंतु दुसऱ्या ‘ट्रम्प सामना’मध्ये ताई झू यिंगने रितुपर्णा दासचा प्रतिकार १५-१२, १५-१२ असा मोडून काढत बेंगळूरुला ३-३ अशी बरोबरी साधून दिली. मग निर्णायक पाचव्या सामन्यात चॅन सून आणि हाए वॉन यांनी ख्रिस अ‍ॅडकॉक आणि गॅब्रिएल अ‍ॅडकॉक यांचा १५-१३, १५-१० अशी धूळ चारून बेंगळूरुच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

* वेळ : सायंकाळी ७ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १