लंडन : कर्णधार मार्टिन ओडेगार्डच्या दोन गोलच्या जोरावर आर्सनलने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात वोल्व्हसवर २-० असा विजय मिळवला. या विजयासह आर्सनलने ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेच्या विश्रांतीला प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत मँचेस्टर सिटीवर (३२ गुण) पाच गुणांची आघाडी मिळवली आहे. आर्सनलने आपल्या सामन्यात विजय नोंदवला, तर सिटीला पराभव पत्करावा लागला. आर्सनल ३७ गुणांसह अग्रस्थानी असून न्यूकॅसल ३० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

आर्सनल आणि वोल्व्हस यांच्यामधील सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ पाहण्यास मिळाला. मात्र, दोन्ही संघांनी भक्कम बचावही केला. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता. दुसऱ्या सत्रात ओडेगार्डने (५४ आणि ७५व्या मिनिटाला) दोन गोल करत आर्सनलला मजबूत स्थितीत पोहोचवले.

अन्य सामन्यात, मँचेस्टर सिटीने ब्रेंटफर्डकडून १-२ अशी हार पत्करली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच ब्रेंटफर्डने आक्रमक खेळ केला. आयवान टोनीने (१६व्या मिनिटाला) गोल करत ब्रेंटफर्डला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत मँचेस्टर सिटीच्या फिल फोडेनने गोल झळकावत सामना मध्यंतरापर्यंत १-१ असा बरोबरीत आणला. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांकडून बरोबरीची कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. अखेर भरपाई वेळेत टोनीने सिटीच्या बचावाला भेदत ब्रेंटफर्डला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. जी अखेरीस निर्णायक ठरली.