वृत्तसंस्था, समरकंद
भारताची ग्रँडमास्टर आर. वैशालीने ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटाचे विजेतेपद राखण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. ही स्पर्धा सलग दोन वेळा जिंकणारी ती पहिली बुद्धिबळपटू ठरली. या कामगिरीसह तिने प्रतिष्ठेच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. सोमवारी झालेल्या अखेरच्या ११व्या फेरीअंती वैशाली आणि कॅटेरिना लायनो यांचे समान आठ गुण होते. मात्र, सरस ‘टायब्रेक’ गुणफरकामुळे वैशालीने विजेतेपद राखले.
अखेरच्या फेरीत वैशालीसमोर माजी जगज्जेत्या चीनच्या टॅन झोंगयीचे, तर लायनोसमोर उलविया फतालियेवाचे आव्हान होते. उलवियाने अद्याप ग्रँडमास्टरचा किताबही न मिळवल्याने या लढतीत लायनोचे पारडे जड मानले जात होते. मात्र, लायनो सर्वोत्तम खेळ करण्यात अपयशी ठरली आणि तिला बरोबरीवर समाधान मानावे लागले.
त्यानंतर वैशालीने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना मानसिक कणखरता दाखवून आपल्यापेक्षा अधिक अनुभवी झोंगयीला बरोबरीत रोखले. ही कामगिरी तिला स्पर्धा जिंकण्यासाठी पुरेशी ठरली. वैशालीने या स्पर्धेत ११ फेऱ्यांत सहा विजय मिळवले, तर चार लढती बरोबरीत सोडवल्या. तिला एका लढतीत पराभव पत्करावा लागला. लायनोने एकही लढत गमावली नाही, परंतु सहा लढती बरोबरीत सोडविण्याचा तिला फटका बसला. वैशाली क्रमवारीत तिच्यापेक्षा वरच्या स्थानावर असलेल्या झोंगयीविरुद्ध खेळली आणि याचा तिला ‘टायब्रेक’मध्ये फायदा झाला. ‘टायब्रेक’मध्ये वैशालीच्या खात्यावर लायनोपेक्षा एक गुण अधिक होता.
गुकेशचा विजय
खुल्या विभागात, अखेरच्या ११व्या फेरीत गतविजेत्या विदित गुजराथीने अभिमन्यू मिश्राविरुद्ध बरोबरीची नोंद केली. निहाल सरीन आणि मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह, दिव्या देशमुख आणि इव्हान चेपारिनोव, प्रज्ञानंद आणि निकोलस थिओदोरू यांच्यातील लढतीही बरोबरीत सुटल्या. जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशने स्पर्धेची विजयी सांगता करताना आंद्रे वोलोकिटिनला नमवले. या विभागात नेदरलँड्सचा अनिश गिरी विजेता ठरला, तर जर्मनीचा माथियन ब्ल्यूबाऊम दुसऱ्या स्थानी राहिला. त्यामुळे हे दोघे ‘कँडिडेट्स’साठी पात्र ठरले. प्रज्ञानंदला या स्पर्धेत अपेक्षित यश मिळवता आले नसले, तरी तोसुद्धा ‘कँडिडेट्स’ प्रवेशासाठी भक्कम स्थितीत आहे.
तिसरी भारतीय
पुढील वर्षीच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेतील प्रवेश निश्चित करणारी वैशाली तिसरी भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. याआधी दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांनी अशी कामगिरी केली होती. विश्वचषक स्पर्धेत दिव्या विजेती, तर हम्पी उपविजेती ठरली होती. याच कामगिरीच्या आधारे त्या ‘कँडिडेट्स’साठी पात्र ठरल्या.
‘कँडिडेट्स’चे महत्त्व…
‘कँडिडेट्स’ स्पर्धेतील विजेत्या बुद्धिबळपटूंना जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याच्या जगज्जेत्यांना आव्हान देण्याची संधी मिळते. सध्या पुरुषांमध्ये भारताचा दोम्माराजू गुकेश आणि महिलांमध्ये चीनची जू वेन्जून हे जगज्जेते आहेत. या दोघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळवण्यासाठी पुढील वर्षी ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत पुरुष आणि महिला विभागात प्रत्येकी आठ बुद्धिबळपटू आपले सर्वस्व पणाला लावतील.