न्यूझीलंडने भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय वंशाच्या रचीन रवींद्रने या संघात स्थान पटकावलं आहे. ‘रचीन’ या नावाची गोष्ट अनोखी आहे. भारताचे माजी कर्णधार आणि बारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नावातील ‘र’ आणि मास्टरब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या नावातील ‘चिन’ असं एकत्र करुन ‘रचीन’ हे नाव ठेवण्यात आलं आहे. 23वर्षीय रवींद्रने यंदाच्या वर्षीच वनडे पदार्पण केलं आहे. ३ कसोटी, ७ वनडे आणि १८ट्वेन्टी२-० सामन्यात त्याने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगायोग म्हणजे २०२१मध्ये भारताविरुद्ध कानपूर इथे रवींद्रने कसोटी पदार्पण केलं होतं. ती कसोटी अनिर्णित राखण्यात रवींद्रने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर वानखेडे इथे झालेल्या कसोटीतही तो खेळला होता.

रचीनने यंदा श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केलं. ७ सामन्यात त्याच्या नावावर ७ विकेट्स आहेत. आशियाई उपखंडात खेळण्याचा रवींद्रचा अनुभव उपयोगी ठरू शकतो तसंच तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो या विचारातून न्यूझीलंडने त्याला संघात समाविष्ट केलं आहे.

दीपक पटेल, इश सोधी, जीतन पटेल, जीत रावल, रॉनी हिरा, तरुण नथुला, एझाझ पटेल या भारतीय वंशाच्या आणि न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रवींद्रचा समावेश झाला आहे.

२०१६ मध्ये झालेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धेत रवींद्र न्यूझीलंड संघाचा भाग होता. रवींद्रचे बाबा रवी कृष्णमूर्ती हे बंगळुरूचे असून ते नव्वदीच्या दशकात न्यूझीलंडला रवाना झाले. न्यूझीलंडमध्ये ते हट हॉक्स क्लब चालवतात. या क्लबतर्फे भारतात दरवर्षी काही खेळाडू येतात. हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई अशा विविध भारतीय शहरांमध्ये खेळण्याचा सराव व्हावा म्हणून हे खेळाडू येत असतात. रवींद्र २०११ पासून सातत्याने भारतात येतो आहे.

मूळच्या लुधियानाच्या इश सोधीच्या बरोबरीने भारतीय कनेक्शन असणारा रवींद्र न्यूझीलंडच्या ताफ्यात असणार आहे. दुखापतीतून सावरलेल्या केन विल्यमसनचं पुनरागमन झालं आहे. केन वर्ल्डकपमधला पहिला सामना खेळू न शकल्यास टॉम लॅथम नेतृत्वाची धुरा सांभाळेल. डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग सलामीवीराच्या भूमिकेत असतील. ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मॉट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन वेगवान आक्रमण सांभाळतील.

मिचेल सँटनर, इश सोधी आणि रचीन रवींद्र हे तीन फिरकीपटू प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. उत्तम फॉर्मात असलेले डॅरेल मिचेल आणि मार्क चॅपमन संघाचा भाग आहेत. विकेटीकीपिंग, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी असं सगळं करू शकणाऱ्या ग्लेन फिलीप्सला संधी मिळाली आहे. २०१९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सुपर ओव्हरचा भाग असलेला अष्टपैलू खेळाडू जेमी नीशामवर निवडसमितीने विश्वास दाखवला आहे. अष्टपैलू मायकेल ब्रेसवेल आणि वेगवान गोलंदाज अॅलन मिलने यांचा दुखापतीमुळे संघनिवडीसाठी विचार होऊ शकलेला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rachin ravindra name inspired by sachin tendulkar rahul dravid is in newzealand world cup squad psp