चुरशीने झालेल्या लढतीत ०-३ अशा पिछाडीवर असलेल्या उत्तर प्रदेश विझार्ड्सने पंजाब वॉरियर्सवर ४-३ असा रोमहर्षक विजय मिळविला आणि हॉकी इंडिया लीगमध्ये सनसनाटी कांस्यपदक पटकाविले. व्ही. आर. रघुनाथ याने हॅट्ट्रिकसह चार गोल करीत उत्तर प्रदेशच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
शेवटच्या सेकंदापर्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत ३९व्या मिनिटांपर्यंत पंजाबकडे ३-० अशी आघाडी होती. तथापि जिगरबाज खेळ करीत उत्तर प्रदेशने तीन गोल करीत पूर्ण वेळेत ३-३ अशी बरोबरी केली. त्यानंतर झालेल्या अलाहिदा वेळेतील शेवटचे तीस सेकंद बाकी असताना रघुनाथ याने स्वत:चा व संघाचा चौथा गोल केला. त्याने पूर्ण वेळेत ४१वे मिनिट, ६१वे मिनिट व ६२व्या मिनिटाला गोल केले. पंजाबकडून जेम्स डायर याने तिसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करीत संघाचे खाते उघडले. सातव्या मिनिटाला मार्क नॉलेसच्या पासवर एस. व्ही. सुनील याने संघाचा दुसरा गोल केला तर ३९व्या मिनिटाला रणजितसिंग याने संघाचा तिसरा गोल नोंदविला. मध्यंतराला पंजाबकडे २-० अशी आघाडी होती. पंजाब संघाने या सामन्यात पेनल्टी कॉर्नरसह अनेक संधी वाया घालविल्या अन्यथा हा सामना त्यांनी जिंकला असता.