भारतीय युवा क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेट संघाची भिंत म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राहुल द्रविडने २२ जून १९९६ मध्ये क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्डसच्या मैदानात पहिला चेंडू खेळला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सौरभ गांगुली आणि द्रविडने एकाचवेळी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हा सामना २० जून ते २४ जून दरम्यान रंगला होता. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात भारतासमोर ३४४ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय सलामीची जोडी स्वस्तात बाद झाल्यानंतर या कसोटी सामन्यात राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या जोडीने भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. गांगुलीने या सामन्यात १३१ धावांची खेळी करत कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले. तर द्रविडचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले होते. द्रविडने या सामन्यात ६ चौकाराच्या मदतीने ९५ धावा केल्या होत्या. यासाठी त्याने तब्बल ३६३ चेंडू खेळले. राहुल द्रविडने त्याच्या कारिकिर्दीत तब्बल ३१२५८ चेंडूचा सामना केला असून, ४४१५२ मिनिटे त्याने मैदानावर घालवली आहेत.
सुरुवातीच्या काळात द्रविडच्या संत खेळीवर अनेकदा टीका झाली. मात्र त्याने वेळोवेळी संघाच्या मदतीला धावून येत आपला संयम कायम ठेवत क्रिकेटच्या इतिहासात शैलीदार संयमी खेळीला सिद्ध केले. त्याला भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखले जावू लागले. बदलत्या काळासोबत द्रविडनेही स्वत:च्या खेळीत बदल केला. त्यामुळेच तो तिन्ही प्रकारातही क्रिकेट खेळताना दिसला. त्याने भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा देखील सांभाळली आहे. आयपीएलमध्ये तसेच काही आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात त्याने झटपट धावा करु शकतो, याची प्रचिती दिली. २४ जानेवारी २०१२ मध्ये राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला.
द्रविडने योग्यवेळी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याचा क्रिकेटचा प्रवास थांबलेला नाही. अर्थात क्रिकेटच्या मैदानातील संयमी आणि तंत्रशुद्धशैलीचा हा खेळाडू सध्या युवा भारतीय संघाला प्रशिक्षण देतोय. त्याच्या मार्गदर्शनाचा भारतीय क्रिकेटला नक्कीच फायदा होईल.