उत्तर प्रदेश व रेल्वे संघाने वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत शानदार विजय मिळवीत आपल्या बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. भारतीय खाद्य महामंडळाने पहिला विजय नोंदविला.
रेल्वे संघाने तामिळनाडू संघाचा ६-० असा दणदणीत पराभव केला. त्या वेळी पूर्वार्धात त्यांनी ३-० अशी आघाडी घेतली होती. मलकसिंग, अमित रोहिदास व विनोदकुमारसिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
उत्तर प्रदेशने झारखंडला ४-१ असे हरविले. त्या वेळी त्यांच्याकडून दिवाकर राम याने पेनल्टी कॉर्नरद्वारा दोन गोल केले. जयकिरण व तुषार खांडेकर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवीत संघाच्या विजयास हातभार लावला. झारखंडचा एकमेव गोल पेनल्टी स्ट्रोकद्वारा चंदन ऐंद याने केला.
भारतीय खाद्य महामंडळाने हरयाणाचा ४-१ असा पराभव करीत स्पर्धेत पहिला विजय नोंदविला. त्या वेळी विजयी संघाकडून गजेंद्रजित याने दोन गोल केले, तर सुनीलकुमार व विक्रम यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. हरयाणाचा एकमेव गोल हरपालसिंग याने केला.