मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मुंबई विरुद्ध कर्नाटक यांच्यात रणजी सामना पार पडला. मुंबईला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावर मुंबईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. मात्र रविवारी अखेरच्या दिवशी मैदानात एक धक्कादायक घटना घडली. सामना सुरु असताना मैदानात चक्क दोन साप शिरल्याची घटना घडली.

अवश्य वाचा –  Ranji Trophy : घरच्या मैदानावर मुंबईचा दुसरा पराभव, कर्नाटक ५ गडी राखून विजयी 

हा प्रकार लक्षात येताच, मैदानात कर्मचारी आणि खेळाडूंमध्ये चांगलीच धांदल उडाली. अखेरीस सर्पमित्रांच्या मदतीने या दोन्ही सापांना पकडण्यात आलं. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यानही साप दिसल्याचा दावा मैदानात उपस्थित काही लोकांनी केला आहे.

मुंबईची या स्पर्धेतली आतापर्यंतची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यांपैकी मुंबईने केवळ एका सामन्यात विजय मिळवला असून दोन सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. मुंबईच्या खात्यात सध्या ६ गुण जमा आहेत. यानंतर मुंबईसमोर ११ जानेवारीपासून तामिळनाडूचं आव्हान असणार आहे. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानावर हा सामना खेळवला जाईल.