Amit Shukla 5 Wickets Without Conceeding a Run in Ranji Trophy: रणजी ट्रॉफी सामन्यात सर्विसेसचा गोलंदाज अमित शुक्लाच्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. हरियाणा आणि सर्विसेस यांच्यातील सामन्यात अमित शुक्लाने भेदक गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्या डावात अमित शुक्लाने फक्त २७ धावा देऊन ८ बळी घेतले. हरियाणाच्या फलंदाजीला सुरूंग लावणाऱ्या अमित शुक्लाने एकही धाव न देता तब्बल ५ विकेट्स घेतल्या.

अमित शुक्लाच्या या भेदक गोलंदाजीच्या बळावर सर्विसेसने हरियाणाला १११ धावांवर सर्वबाद केलं. अमित शुक्लाच्या धारदार गोलंदाजीमुळे सर्व्हिसेसना हरियाणाविरुद्ध ९४ धावांची आघाडी मिळाली, ज्यांचा संघ फक्त २०५ धावांवर बाद झाला. अमित शुक्लाने ५ षटकांत ५ विकेट्स घेतल्या आणि यादरम्यान त्याने एकही धाव दिली नाही.

अमित शुक्लाने दुसऱ्याच चेंडूवर हरियाणाला अडचणीत टाकलं. त्याने प्रथम सलामीवीर युवराज सिंगला एका धावेवर बाद केलं. त्यानंतर त्याने मयंक शांडिल्य, यशवर्धन दलाल, धीरू सिंग आणि निखिल कश्यप यांचे बळी घेतले. अमित शुक्लाने पाच मेडन षटकं टाकून ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर शुक्लाने आणखी तीन विकेट्स घेतल्या. त्याने कपिल हुडा, पार्थ शिव आणि अंशुल कंबोज यांना बाद करून हरियाणाला १११ धावांमध्ये गुंडाळलं.

अमित शुक्ला हा डावखुरा फिरकी गोलंदाज असून तो २२ वर्षांचा आहे. अमितने आतापर्यंत ७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३२ विकेट्स घेतल्या आहेत. तर लिस्ट ए मधील ६ सामन्यांत ६ तर टी-२० मध्ये ४ सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या आहेत.

अमित शुक्लाची रणजी ट्रॉफीतील ही स्पेल आयपीएल मिनी लिलावापूर्वी लक्षवेधी ठरली आहे. अनेक आयपीएल फ्रँचायझींना संघांमध्ये भारतीय फिरकी गोलंदाजांची गरज आहे. अमित आयपीएल लिलावात उतरला तर त्याचा रेकॉर्ड व रणजी सामन्याती ही कामगिरी पाहता त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता आहे.