श्रीकांत मुंढेच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी क्रिकेट लढतीत राजस्थानवर ९ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. राजस्थानने पहिल्या डावात २७० धावांची मजल मारली. पुनीत यादवने १७ चौकार आणि एका षटकारासह १२७ धावांची खेळी केली. महाराष्ट्रातर्फे समद फल्लाने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना महाराष्ट्राने २७४ धावा करत नाममात्र आघाडी मिळवली. चिराग खुराणा (८२) आणि श्रीकांत मुंढे (६०) यांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या १३० धावांच्या भागीदारीमुळेच महाराष्ट्राला आघाडी मिळवता आली.
राजस्थानतर्फे दीपक चहारने ४ तर पंकज सिंगने ३ बळी घेतले. दुसऱ्या डावात राजस्थानची श्रीकांत मुंढेच्या भेदक गोलंदाजीसमोर घसरगुंडी उडाली.
राजस्थानच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. राजस्थानचा डाव १०६ धावांतच गडगडला. श्रीकांतने ३८ धावांत ६ बळी घेत महाराष्ट्राच्या विजयाची पायाभरणी केली. विजयासाठी मिळालेले १०३ धावांचे लक्ष्य एका विकेटच्या मोबदल्यात गाठत महाराष्ट्राने दणदणीत विजयाची नोंद केली.
स्वप्नील गुगळेने ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५६ धावांची खेळी केली. गेल्यावर्षी रणजी स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या महाराष्ट्राची यंदा मात्र अडखळत सुरुवात झाली होती. मात्र या शानदार विजयासह महाराष्ट्राने ६ गुणांची कमाई केली आहे.
अष्टपैलू खेळ करत महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या श्रीकांतला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
राजस्थान (पहिला डाव) : २७०
महाराष्ट्र (पहिला डाव) : २७४
राजस्थान (दुसरा डाव) : १०६ (अर्तिश सिंघवी १९, श्रीकांत मुंढे ६/३८)
महाराष्ट्र (दुसरा डाव) : १ बाद १०५ (स्वप्नील गुगळे ५६)
सामनावीर : श्रीकांत मुंढे