गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर रविवारी १५ फलंदाज बाद झाले. त्यामुळेच विदर्भ-महाराष्ट्र यांच्यातील रणजी क्रिकेट सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. शेवटच्या दिवशी महाराष्ट्राला विजयासाठी आणखी २४२ धावांची आवश्यकता असून नऊ फलंदाज बाकी आहेत.
विदर्भ संघाने पहिल्या डावात केलेल्या ३३२ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राने ६ बाद १४४ धावसंख्येवर पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र चिराग खुराणाचा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या शेवटच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे त्यांचा डाव २३७ धावांमध्ये आटोपला. खुराणाने १८४ मिनिटांत पाच चौकारांसह ७४ धावा केल्या व एकाकी लढत दिली. त्याच्या झुंजार खेळामुळेच महाराष्ट्राला दोनशे धावांपलीकडे मजल गाठता आली. विदर्भ संघाकडून आदित्य सरवटेने सर्वाधिक तीन बळी घेतले.
पहिल्या डावात ९५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेणाऱ्या विदर्भ संघाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात सपशेल निराशा केली. आक्रमक खेळ करीत मोठे आव्हान उभारण्याच्या डावपेचात त्यांचे फलंदाज महाराष्ट्राच्या अक्षय दरेकर याच्या प्रभावी माऱ्यापुढे सपशेल अपयशी ठरले. त्यांचा दुसरा डाव अवघ्या १४९ धावांमध्ये कोसळला. दरेकरने पाच बळी घेतले.
विदर्भ संघाने महाराष्ट्रापुढे विजयासाठी २४५ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाला सामोरे जाताना महाराष्ट्राने सलामीवीर स्वप्निल गुगळेला शून्यावर गमावले. खेळ संपला, त्या वेळी महाराष्ट्राची दुसऱ्या डावात १ बाद ३ अशी दयनीय स्थिती होती. शेवटच्या दिवशी महाराष्ट्रास निर्णायक विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. कागदावर महाराष्ट्राकडे खोलवर फलंदाजी आहे हे लक्षात घेता त्यांना निर्णायक विजय मिळविणे शक्य आहे.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ : ३३२ व ४८ षटकांत १४९ (वासीम जाफर ३३, अमोल उबरहंडे ४७; अक्षय दरेकर ५/७८, भरतकुमार सोळंकी २/२१) विरुद्ध महाराष्ट्र : ९०.१ षटकांत २३७ (चिराग खुराणा ७४; आदित्य सरवटे ३/४१, श्रीकांत वाघ २/५५, रवीकुमार ठाकूर २/२८) व १ बाद ३