Afghanistan Cricketer Rashid Khan 2nd Marriage: अफगाणिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू रशीद खानने अवघ्या काही कालावधीतच दुसरं लग्ने केल्याचा मोठा खुलासा केला आहे. अलिकडेच एका चॅरिटी कार्यक्रमात रशीद खान एका महिलेबरोबर बसलेला दिसत होता. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं. फोटो व्हायरल झाल्यानंतर रशीद खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मोठा खुलासा केला.
रशीद खानने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत सर्वांनाच चकित केलं. रशीदने जवळपास एका वर्षाच्या आत दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. रशीद खानने गेल्यावर्षी ३ ऑक्टोबरला अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पख्तूर प्रथेपरमाणे लग्न केलं होतं. त्याच्याबरोबर त्याच्या भावांचादेखील निकाह झाला होता. याची पोस्ट खुद्द रशीदने सोशल मीडियावर केली होती.
रशीदच्या काबुलमधील निकाहला अफगाणिस्तान क्रिकेट संघातील अनेक जण उपस्थित होते. त्याच्या या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. पण आता रशीद खानने पुन्हा लग्न केलं आहे. रशीदने खुलासा केला आहे की, २ ऑगस्ट २०२५ला त्याने त्याच्या आयुष्यातील एक नव्या पर्वाला सुरूवात केल्याचं पोस्ट करत त्याने सांगितलं.
चॅरिटी कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोस्ट शेअर करताना रशीद खानने लिहिलं की, ‘२ ऑगस्ट २०२५ रोजी मी माझ्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरूवात केली आहे. मी निकाह केला आहे. अलीकडेच मी माझ्या पत्नीला एका चॅरिटी इव्हेंटला घेऊन गेलो होतो आणि इतक्या छोट्या गोष्टीवरून अंदाज बांधणं दुर्दैवी आहे. सत्य अगदी स्पष्ट आहे, ती माझी पत्नी आहे, आम्ही एकत्र आहोत आणि आम्हाला काहीही लपवायचं कारण नाही. ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.”
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशीद खानची दुसरी पत्नी ही युकेमध्ये राहणारी अफगाण महिला आहे. त्याची पहिली पत्नी अजूनही रशीदबरोबर आहे की नाही याबाबत काही माहिती समोर आलेली नाही. रशीद खानच्या या खुलाशामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे आणि चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.
