मुंबई : हेल्मेट, पॅडप्रमाणे प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञान हेसुद्धा तुमच्या क्रिकेट साहित्याचाच भाग आहे, असा विचार करा. त्यांच्याविना खेळ मोठा होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेणे गरजेचे आहे, असा सल्ला भारताचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंना दिला. ते मुंबईत आयोजित ‘जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत’ (वेव्हज) बोलत होते.
शास्त्री यांनी १९८१ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून साडेचार दशके ते विविध माध्यमांतून भारतीय क्रिकेटचा भाग आहेत. आम्ही क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा आकाशवाणी (रेडिओ) आणि दूरदर्शन (टीव्ही) ही दोनच माध्यमे होती. मात्र, भारतीय संघाने १९८३ सालची विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर देशात या खेळाचे रूपडे पालटल्याचे शास्त्री म्हणाले.
‘‘भारतीय संघाने गेल्या ४० वर्षांत ‘आयसीसी’च्या बऱ्याच स्पर्धा जिंकल्या आहेत. आम्ही १९८३ मध्ये विश्वचषक जिंकल्याने लोकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ मिळाले. मात्र, केवळ खेळाडू खेळ मोठा करू शकत नाहीत. तुम्हाला इतरांचे साहाय्य आणि पाठबळही लागते. प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञान या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरतात.
पॅड, बॅट आणि हेल्मेट तुमच्या क्रिकेट साहित्याचा भाग असतात. माध्यमे आणि तंत्रज्ञान याकडेही तुम्ही तसेच पाहिले पाहिजे,’’ असे शास्त्री यांनी नमूद केले. ‘‘आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) महत्त्व वाढत चालले आहे. हे खेळाडूंच्या आणि संघांच्या फायद्याचे आहे. खेळाच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे साधन ठरते. गेल्या ४०-४५ वर्षांत खेळात मोठे बदल झाल्याचे मी पाहिले आहे. आता नवनवी माध्यमे पुढे येत आहेत. त्यांच्याविना खेळ इतका मोठा झाला नसता,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.