भारतीय संघाचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. तर अवघ्या सात गुणांच्या फरकाने अश्विनला क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे. रांची कसोटीत जडेजाने दोन्ही डावात मिळून ९ विकेट्स घेतल्या होत्या, तर अश्विनला केवल २ विकेट्स मिळाल्या. रांची कसोटीपूर्वी अश्विन आणि जडेजा क्रमवारीत सामाईकरित्या अव्वल स्थानी होते. पण रांची कसोटीत जडेजा अश्विनपेक्षा वरचढ ठरला आणि याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रमवारीवर देखील झाला.
जडेजा ८९९ गुणांसह पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला, तर अश्विन ८९२ गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. रांची कसोटीचा निकाल लागू न शकल्याने मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियात १-१ अशी बरोबरी कायम आहे. धर्मशाला येथे होणारा चौथा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. धर्मशाला कसोटीत चांगली कामगिरी करून जडेजाला ९०० गुणांचा पल्ला गाठण्याचा विक्रम करता येणार आहे. याआधी अश्विनने ९०० गुणांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर कोणत्याच भारतीय गोलंदाजाला आयसीसी क्रमवारीत एका मोसमात ९०० गुण प्राप्त करता आले नव्हते.
दुसरीकडे फलंदाजांच्या बाबतीत भारताचा ‘मिस्टर डिपेन्डेबल’ चेतेश्वर पुजारा याने आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमारीत थेट दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ९४१ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर पुजाराने ८६१ गुण मिळवत दुसरे स्थान गाठले आहे. पुजाराने इंग्लंडचा जो रुट (८४८) आणि भारताचा कर्णधार विराट कोहली (८२६) यांना मागे टाकले आहे. पुजाराने रांची कसोटीत महत्त्वाच्या क्षणी मैदानात टीच्चून फलंदाजी करत २०२ धावांची खेळी साकारली होती. पुजाराच्या द्विशतकामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर समाधानकारक आघाडी घेता आली.