एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा लखनऊवर थरारक विजय, क्वॉलिफायर-२ मध्ये राजस्थानसोबत करणार दोन हात

या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विजेतेपदाच्या शर्यतीमध्ये टिकून राहिला आहे.

फोटो सौजन्य – आयपीएल ट्विटर

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये आज एलिमिनेटर लढत खेळवली गेली. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघांमध्ये खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरूने बाजी मारली आहे. बंगळुरूने लखनऊच्या संघाचा १४ धावांनी पराभव करत क्वॉलिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. तर आजच्या पराभवामुळे लखनऊ सुपर जायंट्सचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी चॅलेंजर्स बंगळुरूला क्वॉलिफायर २ चा अडथळा पार करावा लागणार आहे. २७ मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वॉलिफायर २ सामना खेळवला जाईल. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि बंगळुरूची लढत होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या २०८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर क्विंटन डी कॉक अवघ्या सहा धावा करून तर मनन वोहरा १९ धावांवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दीपकने ४५ धावा केल्या. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने एकाकी किल्ला लढवत विजय मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. मात्र, जोश हेजलवुडने त्यालाही महत्त्वाच्याक्षणी बाद करत लखनऊच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. आरसीबीच्यावतीने जोश हेजलवुड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन बळी मिळवले तर मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

त्यापूर्वी, पावसाच्या व्यत्ययामुळे उशीरा सुरू झालेल्या या सामन्यामध्ये लखनऊचा कर्णधार के एल राहुलने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिले होते. सुरुवातीला त्याचा हा निर्णय योग्य वाटत होता. मात्र, बंगळुरूच्या रजत पाटीदारने राहुलच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रजतने आक्रमक खेळ करत धमाकेदार शतक साजरं केले. रजत पाटीदारने अवघ्या ५४ चेंडूंचा सामना करत नाबाद ११२ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १२ चौकार आणि सात षटकारांचा समावेश आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. सर्वात भरवशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितले जात होते तो कर्णधार फाफ डू प्लेसिस गोल्डन डकवर बाद झाला. त्यावेळी आरसीबीची अवस्था एक बाद चार अशी होती. त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी फलंदाजीची धुरा सांभाळली. दोघांनी मिळून ६६ धावांची भागीदारी केली.

पण, अगोदर विराट कोहली आणि त्यापाठोपाठ ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्याने आरसीबीचा संघ संकटात आला होता. मात्र, रजत पाटीदारच्या वादळी खेळीमुळे आणि दिनेश कार्तिकच्या ३७ धावांच्या बळावर आरसीबीने लखनऊ समोर २० षटकांमध्ये २०७ धावांचे आव्हान उभे केले होते. लखनऊ सुपर जायंट्सच्यावतीने मोहसीन खान, आवेश खान, कृणाल पंड्या आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

आजच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विजेतेपदाच्या शर्यतीमध्ये टिकून राहिला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rcb beats lsg by 14 runs enters in qualifier 2 vkk

Next Story
चेसेबल मास्टर्स  बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदची अंतिम फेरीत धडक; जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावरील गिरीला पराभवाचा धक्का; जेतेपदासाठी लिरेनचे आव्हान
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी