माणूस म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला प्रेम करण्याचे स्वातंत्र्य जन्मजात असते. मानवाच्या शास्त्रीय रचनेत प्रत्येक व्यक्तीच्या मनाच्या कोपऱ्यात तशी भावना निर्माण होणारी यंत्रणाच बसवलेली आहे. त्यामुळे तुम्ही, आम्ही, आपण सर्वच जण आयुष्यात कुणावर तरी प्रेम करतोच. या प्रेमाची व्याख्या काळाच्या ओघात बदलली असली तरी, विचार पटणारा/री, समजून घेणारा/री किंवा जपणारा/री व्यक्तीच आपल्याला आवडते आणि आपण त्याच्या प्रेमात पडतो. काळ बदलला आणि प्रेमाची परिभाषाही बदलली. पूर्वी दोन भिन्न लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडायची आणि आता समिलगी व्यक्ती प्रेमाची व्याख्या बदलू पाहात आहेत. यात नसíगक आणि अनसíगक हा मुद्दा आला तरी प्रेम करणाऱ्याच्या भावना सारख्याच आहेत. फक्त त्यांची प्रेमाची पद्धत निराळी आहे. आज पाश्चिमात्य देशांत अशा प्रेमाला कायद्याने मान्यता मिळाली आहे. पण तरीही जगाचा, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. म्हणूनच जग जेवढा या गोष्टीला विरोध करेल तेवढय़ाच किंवा त्याहून अधिक द्वेषाने हे प्रेमीयुगुल समाजाला सामोरे जातील आणि आपल्या प्रेमासाठी झगडतील. जगाच्या याच विरोधामुळे किंवा लोक काय म्हणतील या भीतीमुळे लपूनछपून प्रेम करणारा हा समाज आता धाडसाने पुढे येत आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये असेच एक जोडपे जगासमोर समिलगी असल्याचे बिनधास्तपणे सांगत आहे. ग्रेट ब्रिटनच्या महिला हॉकी संघातील खेळाडू केट रिचर्डसन-वॉल्श आणि हेलेन रिचर्डसन-वॉल्श यांनी ऑलिम्पिक स्पध्रेत खेळणाऱ्या पहिल्या समिलगी जोडप्याचा मान मिळवला आहे. लहानपणापासूनच एकत्र असलेल्या या खेळाडूंनी २०१३मध्ये विवाह केला. कारकिर्दीतल्या चढउतारांमध्ये या दोघींनी एकमेकींना सांभाळले, सुख-दु:ख वाटून घेतले. या सर्व वाटचालीत त्यांचा प्रेमाचा अंकुर कसा फुलला, हे त्यांनाच कळले नाही. बालपण एकत्र घालवणाऱ्या या दोघींची कारकीर्दीची सुरुवातही एकत्र झाली. २०००च्या सिडनी ऑलिम्पिक स्पध्रेतून त्यांनी ब्रिटन संघाकडून पदार्पण केले. प्रत्येक बारीकसारीक गोष्टी दोघी एकमेकींना सांगत होत्या आणि त्यावर मिळून तोडगा काढत होत्या. हाच सामंजस्यपणा एकमेकांना आवडला. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतली बरीच वर्षे एकत्र घालवल्यानंतर आलेल्या प्रगल्भतेतून त्यांच्यातील प्रेम बहरू लागले.

२००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पध्रेनंतर केटने तिचा झालेला साखरपुडा मोडून हेलेनसोबतचे नाते जगजाहीर केले. ब्रिटनच्या पुरुष हॉकी संघाचा कर्णधार ब्रेट गेरार्डशी केटचा साखरपुडा झाला होता. केटच्या या निर्णयानंतर साहजिकच घरच्यांकडून विरोध होणे अपेक्षित होते. त्याची तमा न करता या प्रेमी जोडप्याने नव्या आयुष्याच्या दिशेने वाटचाल केली. पाच वर्षांच्या प्रेमाला २०१३मध्ये त्यांनी नात्याचे स्वरूप दिले. ऑक्सफर्डशायर येथे ते विवाहाच्या बंधनात अडकले. त्यावेळी त्यांच्या आनंदासमोर गगनही ठेंगणे वाटत होते. या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांनी संपूर्ण महिला हॉकी संघाला निमंत्रण दिले. केट आणि हेलेन यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात कधी सरमिसळ होऊ दिली नाही. परंतु २०१४च्या हॉकी विश्वचषक स्पध्रेत हेलेनला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यावेळी केटच्या मनातील अस्वस्थता बाहेर आली. तिने तातडीने कर्णधारपदाची भूमिका सोडली आणि हेलेनच्या देखभालीसाठी स्पध्रेतून माघार घेतली. तिच्या या कृत्यावर त्या वेळी अनेकांनी टीका केली. मात्र प्रेमापुढे तिला काहीच दिसत नव्हते. केट आणि हेलेन यांच्या या धाडसानंतर यापुढे अजूनही काही समलिंगी जोडपी पुढे येतील. त्यांच्या या कृत्याला कुणी काही नाव ठेवले तरी त्या मागील भावना या सामान्य माणसाच्या प्रेमासारख्याच आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रेमाला ‘नाते जुळले, मनाशी मनाचे ..’ अशी उपमा द्यायला हरकत नाही.

  • अ‍ॅमस्टरडॅमला १९२८मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पध्रेत खेळणारे जर्मनीचे ओट्टो पेल्टझर हे पहिले समलिंगी खेळाडू आहेत.
  • आतापर्यंत ऑलिम्पिक स्पध्रेत शंभरहून अधिक समलिंगी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यातील ५३ टक्के खेळाडूंनी पदकांची कमाई केली आहे.
  • बीजिंगमध्ये २००८ साली पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पध्रेत एकूण १२ समलिंगी खेळाडू सहभागी झाले होते. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ही संख्या २३वर गेली.
  • रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत लंडनच्या तुलनेत ही संख्या दुपटीने वाढली आहे. जवळपास ४२ समलिंगी खेळाडू रिओत दाखल झाले आहेत. त्यात ३१ महिला, तर ११ पुरुष समलिंगी खेळाडूंचा समावेश आहे.

 

..अन् तिने तिला लग्नाची मागणी घातली

ब्राझीलच्या महिला रग्बी संघातील खेळाडू इसाडोरा केरुल्लोला रग्बी स्पध्रेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. तिची प्रेयसी माजरेरी इन्याने थेट मैदानावर प्रवेश करत सर्वादेखत केरुल्लोला लग्नाची मागणी घातली. इन्याच्या या मागणीला सहमती दर्शवत केरुल्लोने तिला चुंबन दिले.

 

स्वदेश घाणेकर

swadesh.ghanekar@expressindia.com