आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा, पुल्लेला गोपीचंद यांच्या रूपात लाभलेला खंबीर मार्गदर्शक आणि अथक मेहनत यांच्या बळावर सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. चीनच्या खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढत सायनाने स्वत:च्या नावाची छाप उमटवली आहे. देशातल्या बॅडमिंटन चळवळीला गतिमानता देण्यात प्रेरक ठरलेल्या सायनाच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्पर्धाची तब्बल २२ जेतेपदे आहेत. सायना नेहवाल हा ब्रॅण्ड प्रस्थापित करताना खेळातली एकाग्रता तिने ढळू दिली नाही.
दुखापतींमुळे सायनाच्या प्रगतीला खीळ बसली. त्यातच गोपीचंद यांच्याऐवजी बंगळुरू येथे विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याच्या निर्णयाने उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. मात्र ती विचलित झाली नाही. ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदासह सायनाने रिओसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक नशिबाने मिळाले अशी खोचक टिप्पणी टीकाकारांनी केली होती. ऑलिम्पिक पदक हे गुणवत्ता, अथक परिश्रम, सातत्य आणि भाग्य या साऱ्यांचे मिश्रण असते हे सिद्ध करण्याची संधी सायनाकडे आहे. सायनाच्या ऑलिम्पिक पदकाने देशभरात बॅडमिंटन नव्याने रुजले. चार वर्षांत सायनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेत शिखरस्थान गाठले. अब्जावधी देशवासीयांची लाडकी सायना पदकाच्या शर्यतीत आहे. क्रिकेटेतर खेळ आणि महिला क्रीडापटू या दोन्ही आघाडय़ांचा चेहरा असणाऱ्या फुलराणी सायनाने पदक जिंकल्यास एका मोठय़ा तपश्चर्येचे वर्तुळ पूर्ण होईल.
सायनाची कारकीर्द बहरत असतानाच गोपीचंद अकादमीतून उदयास आलेली आणखी एक गुणी खेळाडू. घरातूनच मिळालेला खेळांचा वारसा उंचपुऱ्या सिंधूने नेटाने जपला आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदके पटकावण्याचा पराक्रम तिच्या नावावर आहे. लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठय़ा स्पर्धाची जेतेपदे नावावर करणारी सिंधू पहिल्यांदाच ऑलिम्पिकवारी करणार आहे. मॅरेथॉन रॅलींमध्ये प्रावीण्य असणारी सिंधू उंचीचा सुरेख उपयोग करत तडाखेबंद स्मॅशही लगावते. दुखापतीमुळे सहा महिन्यांहून अधिक काळ कोर्टपासून दूर राहिलेल्या सिंधूने पुनरागमन केले आहे. चीनच्या तुल्यबळ खेळाडूंची भिंत तोडण्यात माहीर सिंधूवर कामगिरीतले ध्रुवीकरण रोखण्याची जबाबदारी आहे. पूर्णपणे तंदुरुस्त आणि जोमाने सराव करणारी सिंधू पदकाची दावेदार होऊ शकते.
अन्यायाविरोधात थेट, रोखठोक आणि स्पष्ट भूमिका घेणारी ज्वाला गट्टा आणि तिची सहकारी अश्विनी पोनप्पा महिला दुहेरीत सहभागी होणार आहे. तब्बल पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या ज्वालाच्या नावावर महिला आणि मिश्र दुहेरीची असंख्य राष्ट्रीय जेतेपदे आहेत. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य, २०१० राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण तर २०१४ मध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या ज्वालाने प्रतिष्ठेच्या उबेर चषक स्पर्धेत भारताला ऐतिहासिक कांस्यपदक मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत ज्वाला आणि अश्विनी जोडीने प्राथमिक फेरीत तीनपैकी दोन सामने जिंकले. मात्र गणितीय समीकरणांमुळे केवळ एका गुणाच्या फरकाने उपान्त्यपूर्व फेरीचे स्थान हुकले. जपान आणि तैपेई सामन्यात फिकसिंग झाल्याची तक्रार या जोडीने केली होती. मात्र त्यासंदर्भात ठोस निर्णय झाला नाही. चार वर्षांनंतर आणखी परिपक्व झालेली ही जोडी ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर दमदार प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ज्वालाचा अनुभव आणि अश्विनीची युवा ऊर्जा हे मिश्रण कमाल करू शकते. राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद तसेच भारतीय बॅडमिंटन संघटनेशी असलेली वादांची पाश्र्वभूमी बाजूला ठेवून खेळण्याचे आव्हान ज्वालासमोर आहे. ज्वालाच्या आग्रहावरून दुहेरी विशेषज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षकाची नियुक्ती सार्थ ठरवण्याची जबाबदारी या जोडीवर आहे.
रिओच्या निमित्ताने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व होणार आहे. एकेरीच्या खेळाडूंवर प्रसिद्धीझोत असताना मनू अत्री आणि सुमित रेड्डी या युवा जोडीने ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. ही पात्रता त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे द्योतक आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरुष दुहेरी प्रकारातील तीव्र स्पर्धा लक्षात घेता मनू आणि सुमित जोडीला पदक अतिशय खडतर आव्हान आहे. पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे दडपण न घेता या दोघांना सर्वोत्तम खेळ करत कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आहे.
सार्वकालीन महान खेळाडू लिन डॅनला नमवण्याची किमया करत किदम्बी श्रीकांतने २०१४ मध्ये चीन सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. सुपर सीरिज दर्जाच्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा श्रीकांत पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या बळावर श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये झेप घेतली. पुरुष गटात असलेल्या चुरशीच्या शर्यतीत श्रीकांतने स्वत:ला सिद्ध केले. मात्र दुखापती आणि ढासळता फॉर्म यामुळे श्रीकांतच्या कामगिरीत घसरण झाली. यंदाच्या वर्षांत सय्यद मोदी स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या श्रीकांतने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. आंध्र प्रदेशातल्या गुंटुरचा श्रीकांत गोपीचंद अकादमीचा विद्यार्थी. अल्पावधीत नाव कमावणाऱ्या श्रीकांतची ही पहिलीच ऑलिम्पिकवारी असणार आहे. ऑलिम्पिकची नवलाई अनुभवत दिमाखदार प्रदर्शन करण्याची क्षमता श्रीकांतकडे आहे. कामगिरीत सातत्य, तंदुरुस्ती आणि मोक्याच्या क्षणी खेळ उंचावल्यास श्रीकांत चमत्कार घडवू शकतो.
– पराग फाटक
parag.phatak@expressindia.com
