Rishabh Pant Stump Mic Video Viral: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकातामध्ये खेळवला जात आहे. पहिल्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात दक्षिण आफ्रिकेने ३ विकेट्स गमावत १०५ धावा केल्या आहेत. यामध्ये रायन रिकल्टन, एडन मारक्रम व तेंबा बावुमा या महत्त्वाच्या फलंदाजांनी विकेट्स आहेत. दरम्यान ऋषभ पंतने कमालीच्या गेम सेन्ससह फिल्डर्सला आधीच सूचना दिली आणि भारताला पुढच्या चेंडूवर विकेट मिळाली.

कुलदीप यादवला पहिल्या कसोटीत प्लेईंग इलेव्हमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि कुलदीपने बुमराहला चांगली साथ देत विकेट्स घेतल्या. कुलदीपच्या गोलंदाजीवर संघाचा कर्णधार तेंबा बावुमा सोपा झेल देत झेलबाद झाला. बॅकवर्ड शॉर्ट लेगला उभा असलेल्या ध्रुव जुरेलनेही अगदी उत्कृष्ट झेल टिपला.

ऋषभ पंतची हुशारी अन् भारताला मिळाली विकेट; मैदानावर काय घडलं?

सामन्यादरम्यान, कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना उपकर्णधार पंतने फिल्डिंग सेट केली. त्याने लेग साईडवरील सर्व क्षेत्ररक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पंतचं यादरम्यानचं बोलणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं. त्याने कुलदीपला सांगितलं की बावुमा स्वीप शॉट खेळेल आणि लेग-साईडवर झेल देईल. खेळाडूंनी तयार राहा. त्यानंतर काही वेळातच, कुलदीपच्या चेंडूवर बावुमा लेग-स्लिपमध्ये झेलबाद झाला.

ऋषभ पंत म्हणताना दिसला, “हा स्वीप मारतो, मस्त कॅच मिळतो याचा इथे, सिंगलसाठी नाही स्वीप मारायला बघतो तो कॅच देतो या बाजूला…” पंतने सांगताच शॉर्ट लेगला उभा असलेला ध्रुव जुरेलही तयार झाला. कुलदीपचा चेंडू त्याच्या बॅटच्या काठाला लागला आणि लेग स्लिपमध्ये ध्रुव जुरेलकडे गेला आणि त्याने झेल टिपला. बावुमा लेग स्लिपमध्ये झेलबाद होताच सर्व खेळाडू पंतकडे पाहायला लागले. बावुमा हा एक धोकादायक फलंदाज आहे आणि गोलंदाजांना थकवण्यासाठी ओळखला जातो, परंतु पंतच्या हुशारीमुळे भारताला त्याची विकेट लवकर मिळाली.

त्याआधी, जसप्रीत बुमराहने रायन रिकेल्टनला बाद केलं आणि त्यानंतर एडेन मारक्रमला बाद केलं. रिकल्टन २३ आणि मारक्रम ३१ धावांवर बाद झाले. बुमराहने डावाच्या ११ व्या षटकात रिकल्टनला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर, १३ व्या षटकात बुमराहने मारक्रमला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केलं. आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे भारताचे तिन्ही यष्टिरक्षक एकत्र क्षेत्ररक्षण करताना दिसले. पंत व्यतिरिक्त, राहुल स्लिपमध्ये आणि जुरेल लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसला.