Rishabh Pant Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारताचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने देखील या मालिकेत धावांचा पाऊस पाडला आहे. तो भारताकडून या मालिकेत दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये त्याने ४२५ धावा कुटल्या आहेत. आता चौथ्या कसोटीत त्याला वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम मोडून काढण्याची संधी असणार आहे.

ऋषभ पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मासह दुसऱ्या स्थानी आहे. रोहित ६७ सामन्यांमध्ये ८८ षटकार मारले आहेत. तर ऋषभ पंतने अवघ्या ४६ सामन्यात ८८ षटकार मारले आहेत. या यादीत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग अव्वल स्थानी आहे. सेहवागच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याची नोंद आहे. सेहवागने १०३ सामन्यांमध्ये ९० षटकार मारले होते. त्यामुळे चौथ्या कसोटीत २ षटकार मारताच तो वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाची बरोबरी करणार आहे. तर ३ षटकार मारताच तो भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचू शकतो.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

वीरेंद्र सेहवाग- ९० षटकार (१०३ सामने)
ऋषभ पंत- ८८ षटकार ( ४६ सामने)
रोहित शर्मा- ८८ षटकार ( ६७ सामने)
एमएस धोनी- ७८ षटकार ( ९० सामने)
रवींद्र जडेजा- ७४ षटकार ( ८३ सामने)

ऋषभ पंत चौथा सामना खेळणार का?

मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात यष्टीरक्षण करत असताना, ऋषभच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे काही षटकं यष्टीरक्षण केल्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं होतं. त्याच्याजागी ध्रुव जुरेल यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात आला होता. दुखापतग्रस्त असलेला ऋषभ पंत फलंदाजीला येणारर का?असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. मात्र, ऋषभ दुखापतग्रस्त असूनही तो फलंदाजीला आला होता. पहिल्या डावात त्याने दमदार अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्या डावात तो स्वस्तात माघारी परतला होता. ऋषभ चौथ्या सामन्यापूर्वी दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे तो चौथ्या सामन्यात खेळणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.