Rohit Sharma New Car Video: रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानापासून हल्ली लांब असला तरी चर्चेत मात्र असतो. रोहित शर्मा नुकताच मोठ्या युरोप सहलीवरून कुटुंबासह मायदेशी परतला आहे. तत्पूर्वी रोहित भारताचा इंग्लंडविरूद्ध अखेरचा कसोटी सामना पाहण्यासाठी ओव्हलच्या मैदानावर पोहोचला होता. यानंतर आता रोहित शर्मा त्याच्या नव्या कारमुळे चर्चेत आहे.
रोहित शर्माने नुकतीच नवीन लॅम्बोर्गिनी ऊरूस कार खरेदी केल्याची चर्चा रंगली आहे. रोहितच्या या नव्या कारचे फोटो, व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्माकडे यापूर्वीही निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी होती, जी त्याने एका काँटेन्स्टमध्ये चाहत्याला भेट दिली. त्यानंतर आता हिटमॅनने केशरी रंगाची नवी कार खरेदी केली आहे.
रोहित शर्माने खरेदी केलेल्या या लॅम्बोर्गिनी कारच्या किमतीची सरूवात ४.५७ कोटींपासून आहे. तर मुंबईत या कारची किंमत ५ कोटींहून अधिक आहे. या कारनंतर आता कारच्या नंबर प्लेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रोहितच्या आधीच्या कारचा नंबर हा त्याची वनडेमधील सर्वात मोठी खेळी जी २६४ धावांची होती, त्याचा नंबर होता. आता त्याच्या नंबरप्लेटवरील नंबर हा ३०१५ आहे.
रोहित शर्माच्या नव्या कारच्या नंबर प्लेटवरील क्रमाकांचा काय आहे अर्थ?
रोहित शर्माच्या नव्या केशरी कारचा नंबर ०३०१५ आहे. या नंबरमागील खास कनेक्शन म्हणजे हा नंबर रोहितची मुलगी समायरा आणि मुलगा अहान यांच्या वाढदिवसाच्या तारखा आहेत. रोहितची मुलगी समायरा हिचा जन्म ३० डिसेंबरला झाला तर मुलगा अहानचा जन्म १५ नोव्हेंबरला झाला आहे.
रोहितच्या या नवीन कारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कार मुंबईतील एका डीलरशिपच्या बाहेर दिसते. रोहित डिलिव्हरी घेत असल्याचा अधिकृत फोटो अद्याप समोर आलेला नाही. मात्र चाहत्यांचा उत्साह हे फोटो, व्हीडिओ पाहून शिगेला पोहोचला आहे.
रोहित शर्माच्या ताफ्यात अनेक कार आहेत. त्याच्या सध्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ एस-क्लास (सुमारे १.५० कोटी रुपये), मर्सिडीज जीएलएस ४०० डी, बीएमडब्ल्यू एम५ (सुमारे १.७९ कोटी रुपये) आणि रेंज रोव्हर एचएसई एलडब्ल्यूबी (सुमारे २.८० कोटी रुपये) यासारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. आता या नवीन लॅम्बोर्गिनीची त्याच्या कलेक्शनमध्ये भर पडली आहे.