करोनामुळे सध्या जगभरातील क्रिकेट सामने बंद आहेत. क्रिकेटपटूंना आपल्या फॅन्सशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत विविध क्रीडा वाहिन्या, संकेतस्थळे क्रिकेटपटूंच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यावर जोर देत आहेत. क्रिकेटपटू देखील आपल्या सहकाऱ्यांशी लाइव्ह चॅटच्या मार्फत संवाद साधत आहेत. नुकताच भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यासोबत इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये गप्पा मारल्या. त्यावेळी रोहितने सध्या फारसा चर्चेत नसलेला एक खेळाडू पुन्हा संघात सामील व्हायला हवा, असं मत व्यक्त केलं.
IPL : “तेव्हा धोनी अंपायरशी तावातावाने भांडला अन्…”
“खूप वर्षे आंतरराष्ट्रीय संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर संघातून वगळलं जाण्याची भावना दु:खदायक असते. आम्ही नेहमी चर्चा करतो की रैना आपल्या संघात पुन्हा खेळायला हवा. तुझ्याकडे अनुभव आहेत. तसेच तू फलंदाजीसह गोलंदाजी आणि फिल्डिंग करण्यातही सक्षम आहेस. मी तुला खूप वर्षांपासून खेळताना बघतोय. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की तुझं टीम इंडियात पुनरागमन व्हायलाच हवं. आपण आपल्या हातात जे आहे ते करत राहू आणि त्या गोष्टीची वाट बघू”, असे रोहितने रैनाशी लाइव्ह चॅट दरम्यान बोलताना सांगितलं.