Why Rohit Sharma Took Yashasvi Jaiswal Bat: भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेची सुरूवात रोहित शर्मासाठी काही खास झाली नाही. रोहित पहिल्याच वनडेत १४ चेंडूत ८ धावा करत बाद झाला. त्यामुळे त्याच्यासाठी हा पुनरागमनाचा सामना फारसा चांगला ठरला नाही. दरम्यान आता एडलेडमधील दुसऱ्या वनडेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, पण एडलेडमधील रोहितचा रेकॉर्ड ही चांगला राहिलेला नाही. दरम्यान रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता ६ महिन्यांनी खेळण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. आगामी वनडे विश्वचषक २०२७ चा विचार करता दोन्ही खेळाडूंना संघातील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. रोहित-विराट सातत्याने नेट्समध्ये सराव करताना दिसत आहेत.

दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानावर कठोर परिश्रम करत आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली नेट्समध्ये एकत्र सराव करताना दिसले. दरम्यान रोहित शर्मा त्याच्याशी बोलतानाही दिसला. याशिवाय एका व्हिडिओमध्ये यशस्वी जैस्वाल फलंदाजीचा सराव करण्यासाठी दोन बॅट घेऊन जाताना दिसत आहे. वाटेत तो रोहित शर्माला भेटतो. दोघेही एकमेकांशी चर्चा करताना दिसतात.

रोहित शर्माने सराव करताना यशस्वी जैस्वालकडून घेतली बॅट

दरम्यान, रोहित यशस्वी जैस्वालची बॅट घेतो आणि शॅडो प्रॅक्टिस सुरू करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित यशस्वीची बॅट घेऊन का सराव करत आहे. रोहित कशी कामगिरी करणार, अशा विविध कमेंट्स चाहते करताना दिसत आहेत. कसोटी आणि टी-२० मधून निवृत्त झालेल्या रोहित शर्मावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रचंड दबाव आहे.

यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग सारखे सलामीवीर लिस्ट ए मध्ये चांगली कामगिरी करत आहेत. ते सर्व टीम इंडियाच्या एकदिवसीय संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धेत आहेत. या सगळ्यामध्ये, रोहितला ऑस्ट्रेलियातील या दोन एकदिवसीय सामन्यांचा तसेच यावर्षी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

रोहित शर्माचा एडलेड ओव्हलमध्ये रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. १२ एकदिवसीय सामन्यांमधील १५ डावांमध्ये त्याने १९.१३ च्या सरासरीने फक्त २८७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ४३ आहे. २०२५ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये एडलेड ओव्हल येथे झालेल्या त्याच्या शेवटच्या सामन्यात रोहितला संघर्ष करावा लागला. गुलाबी चेंडूच्या कसोटीत त्याने तीन आणि सहा धावा केल्या आणि स्कॉट बोलँड आणि पॅट कमिन्सचा बळी ठरला होता.