संजीवनी जाधव, आंतरराष्ट्रीय धावपटू

कविता राऊत, मोनिका आथरे या आंतरराष्ट्ीय धावपटूंचा वारसा पुढे चालवण्याची धमक दाखवणाऱ्या संजीवनी जाधवने मुंबई मॅरेथॉनमध्ये पदार्पणातच बाजी मारून पुन्हा एकदा सर्वाचे लक्ष वेधले. नाशिकच्या संजीवनीने भविष्यात भारताला अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र एकेकाळी सातत्याने आलेल्या अपयशामुळे संजीवनीचे मनोबल खचले होते, परंतु वडिलांनी दाखवलेल्या विश्वासाने तिने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवला. त्यामुळेच जागतिक विद्यापीठ आणि आशियाई अजिंक्यपदसारख्या आव्हानात्मक स्पर्धामध्ये पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्याचे ती सांगते. पेशाने शिक्षक असलेले वडीलच प्रेरणास्रोत असल्याचे संजीवनी अभिमानाने सांगते. या स्पर्धेच्या निमित्ताने संजीवनशी केलेली खास बातचीत –

* मुंबई मॅरेथॉनच्या पदार्पणातील जेतेपदाबाबत काय सांगशील?

मुंबई मॅरेथॉनमध्ये सराव म्हणून अखेरच्या क्षणाला येथे धावण्याचा आम्ही निर्णय घेतला. दैनंदिन सरावात आम्ही २० किलोमीटर धावतोच. त्याची चाचपणी करण्यासाठी आणि पुढील स्पर्धाचा सराव म्हणून मुंबईत धावली. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याचा आनंद आहे. मात्र १ तास, १५ मिनिटे, ३५ सेकंदांची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी गाठण्यात अपयश आल्याची खंत आहे.

* मुंबई मॅरेथॉनमध्ये तुला कोणाची आव्हाने होती?

ही मॅरेथॉन स्पर्धात्मक झाली. अनेक वरिष्ठ खेळाडूंशी स्पर्धा होती. मोनिका येथे सातत्याने सहभाग घेत आहे आणि त्यामुळे येथील वातावरणाचा तिच्याकडे चांगला अनुभव आहे. स्पर्धेत दाखल होण्यापूर्वी तिने माझ्याकडे हे अनुभव कथन केले होते आणि त्याचा फायदा झाला. सुरुवातीपासून आम्ही १०-१५ मुली एकत्र पळत होतो. ७-८ किलोमीटरनंतर मी हा गट सोडला आणि आघाडी घेतली. शेवटच्या दोन किलोमीटरमध्ये गती वाढवत बाजी मारली.

* २०१७ वर्ष तुझ्यासाठी फलदायी ठरले आणि २०१८ची सुरुवातही दणक्यात केली. पुढील लक्ष्य काय आहे?

जागतिक विद्यापीठ स्पर्धेत १०,००० मीटर शर्यतीत रौप्यपदकाने आयुष्याला नवी दिशा दाखवली. यापूर्वी भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ५,००० मीटरमध्ये मला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आता मुंबई मॅरेथॉनमधील पदकाने मनोबल आणखी उंचावले आहे. हेच दोन माझे प्रमुख अ‍ॅथलेटिक्स प्रकार आहेत. त्यामुळे आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून फेडरेशन चषक स्पर्धेत पात्रता निकष पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. आता इराणला होणाऱ्या आशियाई इनडोअर स्पर्धेत पदक पटकावण्याचा प्रयत्न करीन. तिथे ३००० मीटर प्रकारात भाग घेणार आहे.

* घरच्यांकडूनच तुला क्रीडा क्षेत्रात वळण्याचे बाळकडू मिळाले का?

आजोबा कुस्तीपटू होते, परंतु माझ्या यशाचे श्रेय मी वडिलांना देईन. त्यांनी मला खेळाकडे वळवले. सुरुवातीला मी कुस्ती आणि धावणे या दोन्ही खेळांमध्ये सहभागी व्हायचे. इयत्ता पाचवीपर्यंत मी दोन्ही खेळांत नैपुण्य मिळवले, परंतु कुस्तीसाठी प्रशिक्षक आणि पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे धावपटू बनण्याचा निर्णय घेतला. वडीलच सराव घ्यायचे. सुरुवातीला यश काही मिळत नव्हते. त्यामुळे थोडीशी निराश झाली होती. मात्र वडिलांनी मला खचू दिले नाही. त्यांनी सातत्याने माझे मनोबल उंचावले आणि त्यामुळेच मी यश मिळवू शकले. वडील माझे प्रेरणास्रोत आहेत.

* भोंसला मिलिटरी स्कूलचा प्रवास कसा झाला?

सुरुवातीला मी जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये हौस म्हणून सहभाग घ्यायची. त्यात पदक मिळवू लागल्यावर आत्मविश्वास वाढला. नववी आणि दहावीत असताना राष्ट्रीय स्पर्धामध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर या खेळात कारकीर्द करण्याचा निर्धार केला. त्या वेळी भोंसला मिलिटरी स्कूलबद्दल वृत्तपत्रांमध्ये वाचले होते. माझ्या गावापासून ते काही किलोमीटर अंतरावर असल्याने तेथे प्रवेश मिळवण्याची धडपड सुरु झाली. स्थानिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी माझा खेळ पाहिला. त्यांनी माझ्या घरच्यांना मी अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवावी असा सल्ला दिला. त्यानंतर भोंसला मिलिटरी स्कूलमधील माझा प्रवास सुरू झाला.