दोन माजी जगज्जेत्यांमधील ‘क्लच’ बुद्धिबळ लढतीच्या पहिल्या दिवशी भारताच्या विश्वनाथन आनंदविरुद्ध रशियाच्या गॅरी कास्पारोवने आघाडी मिळवली. कास्पारोवने तिसरा डाव जिंकला, तर अन्य तीन डाव बरोबरीत सुटले. त्यामुळे कास्पारोवने २.५-१.५ अशी आघाडी घेतली आहे.
बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या कास्पारोव आणि आनंद यांच्यातील प्रदर्शनीय लढतीचा तिसरा डाव चुरशीचा ठरला. कास्पारोवने २१ वर्षांपूर्वी सर्वोच्च स्तरावरील बुद्धिबळाला अलविदा केले होते. मात्र, अजूनही दर्जेदार खेळ करण्यासाठी आपण सक्षम असल्याचे दाखवून देताना त्याने या लढतीचा तिसरा डाव ६२ चालींत जिंकला. आनंदलाही विजयाची संधी होती, पण त्याला निर्णायक चाली रचता आल्या नाहीत.
ही प्रदर्शनीय लढत ‘चेस ९६०’ प्रारूपानुसार होत असून पहिल्या दिवशी दोन जलद आणि दोन अतिजलद डाव खेळविण्यात आले. पहिल्या दोन डावांत दोन्ही खेळाडूंनी बरोबरीवर समाधान मानले. त्यातही पहिल्या डावात आनंदने अधिक सरस खेळ केला होता, पण मोक्याच्या क्षणी त्याच्याकडून काही चुका झाल्याने कास्पारोवला डाव बरोबरीत सोडवता आला. दुसऱ्या आणि चौथ्या डावात दोन्ही खेळाडूंनी संयम राखणेच पसंत केले. तिसरा डाव मात्र रंगतदार ठरला. यात अखेरच्या टप्प्यात आनंदने राजा आणि अन्य मोहरे गमावले. त्यामुळे त्याला हार पत्करावी लागली. ही लढत आणखी दोन दिवस चालणार आहे. दुसऱ्या दिवशी प्रत्येक विजयामागे दोन गुण, तर तिसऱ्या दिवशी प्रत्येक विजयामागे तीन गुण दिले जातील.