आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकामागून एक विक्रम रचणारा, शतकामागून शतके पाहण्याची सवय लावणारा, आपल्या खेळाने अवर्णनीय, अद्भुत आनंद देणारा आणि क्रिकेटचा पहिला राजदूत होण्याचा मान पटकावणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला मंगळवारी भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ किताबाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब पटकावणारा सचिन हा पहिलाच खेळाडू असून पहिलाच विद्यमान राज्यसभा सदस्यही आहे. गेली २४ वर्षे अविरतपणे भारतीयांसह तमाम क्रिकेटजगताला अवीट आनंद देणाऱ्या सचिनने यापुढेही अविरतपणे देशाचीच सेवा करणार असल्याचे मत या प्रसंगी व्यक्त केले. ‘‘भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन,’’ अशी ग्वाही सचिनने या वेळी दिली.
‘‘ मी क्रिकेट खेळणे थांबवले असले तरी यापुढेही देशाची अविरतपणे सेवा करीत राहणार आहे. भारतीयांच्या चेहऱ्यावरील हसू आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन,’’ असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केल्यावर सचिनने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, ‘‘माझ्यासाठी हा सर्वोच्च सन्मान आहे आणि भारतरत्नसारखा सर्वोच्च सन्मान स्वीकारल्यावर मला अतीव आनंद झाला आहे. भारतासारख्या नितांत सुंदर देशामध्ये जन्मल्याचा मला अभिमान आहे. माझ्यावर नि:स्वार्थीपणे प्रेम करणाऱ्या, मला कायम पाठिंबा देणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १६ नोव्हेंबरला वेस्ट इंडिजविरुद्धचा अखेरचा सामना खेळत सचिनने क्रिकेटला अलविदा केला होता. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर काही क्षणातच सचिनला भारतरत्न पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले होते. सचिन पुढे म्हणाला की, ‘‘जेव्हा पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा जी माझी प्रतिक्रिया होती, त्याच प्रतिक्रियेचा मी पुनरुच्चार करू इच्छितो. हा सन्मान मी माझ्या आईसह ज्या मातांनी आपल्या मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयुष्य वेचले, अशांना समर्पित करतो.’’
या वेळी सचिनने ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रो. राव यांचेही अभिनंदन केले. तो म्हणाला की, ‘‘ भारतरत्न हा सन्मान मिळाल्याबद्दल मी प्रो. राव यांचे अभिनंदन करतो. भारतीय युवकांना या क्षेत्राकडे वळवण्यासाठी त्यांची आदर्शवत अशी अतुलनीय कामगिरी आहे.

सचिन हा अजातशत्रू- टायगर वूड्स
नवी दिल्ली : अनेक गोलंदाजांचे चेंडू अंगावर झेलले असले, तरी त्याने कधीही शाब्दिक हल्ले केले नाहीत, तर आपल्या बॅटनेच या साऱ्या गोष्टींचा कायम समाचार तो घेत राहिला. क्रिकेटच्या रणांगणात जरी तो प्रतिस्पर्धी असला तरी मैदानाबाहेर तो अजातशत्रूच होता. हेच नेमकं भावलं ते महान गोल्फपटू टायगर वूड्सला. सचिन आणि वूड्स हे दोघेही खऱ्या अर्थाने खेळातले सेलिब्रेटीच, पण सचिन आपल्या स्वभावामुळे नेहमीच साऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनत आला आहे, त्याला वूड्सही अपवाद नाही. ‘‘सचिन हा एक महान क्रिकेटपटू आहे, त्याचबरोबर तो शांत स्वभावाचा व्यक्ती असून अजातशत्रूही आहेच,’’ अशी प्रतिक्रिया वूड्सने सचिनला भारतरत्न दिल्यावर व्यक्त केली. राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमात वूड्सला खास आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्याने सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला.