बार्सिलोना : बदली खेळाडू गोन्सालो रामोसने नियमित वेळेतील अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर गतविजेत्या पॅरिस सेंट-जर्मेन संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या लढतीत तुल्यबळ बार्सिलोनाचा २-१ असा पराभव केला. अन्य लढतींत, आर्सेनल, न्यूकॅसल, बोरुसिया डॉर्टमंड आणि नापोली या संघांनी विजय नोंदवले.
बॅलन डी’ओर विजेता ओस्मान डेम्बेले, खविचा क्वारात्सखेलिया आणि डिझेरे डुए यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही सेंट-जर्मेनने यशस्वी कामगिरी सुरू ठेवली. मात्र, या विजयासाठी त्यांना झुंजावे लागले. फेरान टोरेसने १९व्या मिनिटाला गोल नोंदवत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सेंट-जर्मेनने अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. नुनो मेंडेसच्या पासवर सेनी मायुलूने ३८व्या मिनिटाला गोल करत सेंट-जर्मेनला १-१ अशी बरोबरी करून दिली.
उत्तरार्धात सेंट-जर्मेनने गोन्सालो रामोस आणि ली कांग-इन या आक्रमक खेळाडूंना मैदानावर उतरवले. त्यांनी लगेच प्रभाव पाडण्यास सुरुवात केली. ८४व्या मिनिटाला ली याने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. मात्र, सेंट-जर्मेनने निर्णायक गोलसाठी प्रयत्न सुरू ठेवले. अखेर त्यांना ९०व्या मिनिटाला यश आले. अश्रफ हकिमीच्या पासवर रामोसने गोल करत सेंट-जर्मेनला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बार्सिलोनाला पुनरागमन करणे शक्य झाले नाही.
दुसरीकडे, गॅब्रिएल मार्टिनेली आणि बुकायो साका यांच्या गोलच्या जोरावर आर्सेनलने ऑलिम्पियाकोस संघाला २-० असे पराभूत केले. नापोलीने स्पोर्टिंग लिस्बनचा २-१, न्यूकॅसलने युनियन सेंट-गिलोइसचा ४-०, तर बोरुसिया डॉर्टमंडने ॲथलेटिक क्लबचा ४-१ असा पराभव केला.
हालँडचा धडाका कायम
अर्लिंग हालँडने गोलधडाका कायम राखला. मात्र, त्याच्या दोन गोलनंतरही मँचेस्टर सिटीला मोनाकोविरुद्ध २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. हालँडने १५ आणि ४४व्या मिनिटाला गोल नोंदवले. हालँडचा हा चॅम्पियन्स लीग कारकीर्दीतील ५०वा सामना होता आणि त्याच्या नावे ५२ गोल आहेत. चॅम्पियन्स लीगमध्ये अर्धशतकी सामन्यानंतर सर्वाधिक गोलचा विक्रम हालँडच्याच नावे आहे. याआधी रुड व्हॅन निस्टलरॉयने ५० सामन्यांत ४३ गोल केले होते.