Salman Agha Challenge to Indian Team after Pakistan Defeats Bangladesh : आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी महत्त्वाचा ठरलेला सुपर ४ फेरीतील पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना अटीतटीचा झाला. या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर निसटता विजय मिळवून अंतिम फेरीत भारताला आव्हान दिलं आहे. भारतीय संघाने आधी पाकिस्तान आणि मग बांगलादेशला पराभूत करून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान, बांगलादेशला पराभूत करून अंतिम फेरीत दाखल झालेल्या पाकिस्तानी संघाच्या कर्णधाराने भारताला खुलं आव्हान दिलं आहे.

सलमान आगा म्हणाला, “आम्ही अशा पद्धतीने सामना जिंकलोय हे पाहून आम्ही खास संघ आहोत हे सिद्ध झालं आहे. आमचे सगळे खेळाडू उत्तम खेळले. फलंदाजीत काही सुधारणांची आवश्यकता आहे. आम्ही त्यावर काम करू. मी आता अंतिम सामन्यासाठी खूप उत्साही आहे. पुढे काय करायचं ते आम्हाला माहिती आहे. आम्ही कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो, आमचा संघ मजबूत आहे. रविवारी आम्ही भारताला पराभूत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आम्ही कोणत्याही संघाला हरवू इतका मजबूत संघ आहोत.”

सलमान अली आगा काय म्हणाला?

भारताविरुद्ध फायनलपूर्वी शाहीन शाह आफ्रिदीची प्रतिक्रिया

पाकिस्तानी संघाचा कर्णधार म्हणाला, “आजच्या सामन्यात आम्ही उत्तम गोलंदाजी केली. अशा प्रकारची गोलंदाजी केल्यास आम्ही कुठलाही सामना जिंकू शकतो. आम्ही आज क्षेत्ररक्षणातही उजवे होतो. आमचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक शेन आमच्यावर खूप मेहनत घेत आहेत. क्षेत्ररक्षणासाठी आम्ही अतिरिक्त सत्र देखील घेत आहोत. माइक हॅसन आम्हाला म्हणाले होते की तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करू शकत नसाल तर तुमचं संघात काहीच काम नाही. मात्र, आता आमच्या क्षेत्ररक्षणात सुधारणार झाली आहे. आम्ही आता कुठल्याही संघाला पराभूत करण्यासाठी सक्षम संघ आहोत. आम्ही रविवारी पुनरागमन करू. भारताला पराभूत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू.”

पाकिस्तानच्या बांगलादेशवरील विजयात जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची महत्त्वाची भूमिका होती. या सामन्यात आफ्रिदीने फलंदाजी करताना १३ चेंडूत २ षटकारांसह १९ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. त्यानंतर गोलंदाजीत त्याने ४ षटकांत १७ धावा देत ३ बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्याला रविवारच्या सामन्याबद्दल विचारलं असता तो म्हणाला, “भारताविरोधातील सामन्यासाठी आम्ही तयार आहोत.”