नववर्षांची विजयानिशी सुरुवात; केर्बर-पेटकोव्हिक जोडीवर मात

भारताची सानिया मिर्झा आणि तिची स्वित्र्झलडची जोडीदार मार्टिना हिंगीस या जोडीने २०१५ वर्षांतील कामगिरीचा यशाचा कित्ता गिरवताना नववर्षांची झोकात सुरुवात केली. २०१६ च्या पहिल्याच स्पध्रेत मिर्झा-हिंगीस जोडीने डब्लूटीए ब्रिस्बेन टेनिस स्पध्रेत जेतेपद पटकावले. त्यांचे हे सलग सहावे जेतेपद आहे. या अव्वल मानांकित जोडीने अंतिम लढतीत जर्मनीच्या अँगेलिक केर्बर आणि अँड्रिया पेटकोव्हिक जोडीचा ६९ मिनिटांत७-५, ६-१ असा पराभव केला.

जगातील अव्वल क्रमांकाच्या सानिया-हिंगीस जोडीने सलग २६ सामन्यांत आपला विजयी धडाका कायम राखला आहे.  सारा इराणी व रॉबर्टा व्हिन्सी यांनी २०१२ मध्ये सलग २५ सामने जिंकले असून या जोडीने सलग पाच  स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला होता.

पहिल्या सेटमध्ये केर्बर आणि पेटकोव्हिक जोडीने मिर्झा-हिंगीसला कडवे आव्हान दिले. केर्बर-पेटकोव्हिक यांच्याकडे ४-२ अशी आघाडी होती, परंतु मिर्झा-हिंगीस या अनुभवी जोडीने ४-४ अशी बरोबरी मिळवली. नवव्या गेममध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दडपण निर्माण केले. तरीही बिगरमानांकित प्रतिस्पर्धी जोडीने चिकाटीने खेळ करीत ५-५ अशी बरोबरी मिळवली. केर्बर व पेटकोव्हिकने सामना ५-६ असा असताना पुन्हा बरोबरी मिळवून सेट टायब्रेकरमध्ये नेला; परंतु त्यांनी मिर्झा-हिंगीसला सलग दोन ब्रेक करण्याच्या संधी दिल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.

दुसऱ्या सेटमध्ये मिर्झा-हिंगीसने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत एकहाती वर्चस्व राखले.

अझारेंकाने अडीच वर्षांचा दुष्काळ संपवला

विक्टोरिया अझारेंकाने शनिवारी ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पध्रेतील महिला एकेरी गटात चौथ्या मानांकित अ‍ॅगेलिक केर्बरचा ६-३, ६-१ असा पराभव करून अडीच वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. बेलारुसच्या अझारेंकाने २०१३ मध्ये सिनसिनाटी स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते. अझारेंकाने तिसऱ्यांदा ब्रिस्बेन स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सात वर्षांपूर्वी तिने जेतेपद पटकावले होते, तर २०१४ मध्ये सेरेना विल्यम्सने तिला पराभूत केले होते.

रॉजर फेडरर अंतिम फेरीत

स्वित्र्झलडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने सलग तिसऱ्यांदा ब्रिस्बेन  टेनिस स्पध्रेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत फेडररने आठव्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या डॉमिनिक थिएमचा ६-१, ६-४ असा ६० मिनिटांत पराभव केला.