चॅम्पियन्स करंडकातला भारत विरुद्ध पाकिस्तान हा अंतिम सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. रविवारी म्हणजेच उद्या ओव्हलच्या मैदानावर दोन्ही संघ जेतेपदाच्या लढाईसाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील. संपूर्ण देशभरात भारतीय संघ जिंकावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. मात्र अशावेळीही पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याचे मामा मात्र भारतीय संघाच्या बाजूने आहेत.

सरफराजचे मामा मेहबूब हसन हे उत्तर प्रदेशच्या इटवाहचे रहिवासी आहेत. रविवारच्या अंतिम सामन्याबद्दल विचारलं असता, पाकिस्तानच्या संघाची भारतासोबत तुलनाच होऊ शकत नाही असं हसन यांनी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणलंय. ” सरफराजचा संघ आपल्या संघाला कधीही हरवू शकणार नाही. मी आतापर्यंत नेहमी भारतीय संघाला पाठींबा देत आलो आहे. आपल्या संघात पाकिस्तानच्या तुलनेत सरस खेळाडू आहेत, त्यामुळे यावेळीही भारतच चॅम्पियन्स करंडक जिंकेल.” असं मेहबूब हसन म्हणालेत.

याचसोबत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान आपल्याला कोणत्याही गोष्टीचा तणाव वाटला नाही. सरफराज हा त्याच्या संघाकरता चांगली कामगिरी करतो आहे, एक मामा म्हणून मला त्याचा आनंद आहे. असं सांगायलाही हसन विसरले नाहीत. सरफराजची आई ही लग्नानंतर कराची येथे स्थाईक झाली. लग्नानंतरही स्काईपच्या माध्यमातून हसन यांच्याशी ती संपर्कात असते. आतापर्यंत सरफराज आपल्या मामाला ३ वेळा भेटला आहे. भारतात पार पडलेल्या टी २० विश्वचषकादरम्यान पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात सरफराज आणि हसन यांची भेट झाली होती.

पहिल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तावर मात केली होती. मात्र त्यानंतर पाकिस्तानने आपल्या खेळात सुधारणा करुन अंतिम फेरीत धडक दिली. उपांत्य सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडच्या बलाढ्य संघाचा पराभव केला होता. त्यामुळे अंतिम फेरीत सरफराज अहमदच्या संघाचं मनोबल हे नक्कीच उंचावलेलं असणार आहे. त्यामुळे विराट कोहलीची टीम इंडिया हे आव्हान कसं स्विकारते आणि भारत चॅम्पियन्स करंडक पुन्हा आपल्याकडेच राखण्यात यशस्वी होतो का याची उत्सुकता सर्व भारतीयांना लागलेली आहे.