वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेस मंगळवारपासून येथे प्रारंभ होत आहे. यजमान महाराष्ट्रास अंदमान व निकोबार संघाविरुद्ध मोठा विजय मिळविण्याची संधी आहे. हॉकी इंडियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सामने मेजर ध्यानचंद स्टेडियम (पिंपरी चिंचवड) व शिवछत्रपती क्रीडानगरी (बालेवाडी) येथे होणार आहेत. साखळी गटात महाराष्ट्रास हरियाना, उत्तरप्रदेश, मुंबई व अंदमान या संघांशी खेळावे लागणार आहे. अन्य संघांच्या तुलनेत महाराष्ट्रास अंदमानविरुद्ध दणदणीत विजय मिळविण्याची हुकमी संधी आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गेले पंधरा दिवस शिवछत्रपती क्रीडानगरीत कसून सराव केला आहे. या संघातील खेळाडूंना ऑलिम्पिकपटू धनराज पिल्ले, विक्रम पिल्ले व अजित लाक्रा यांच्याकडून बहुमोल सल्ला मिळाला आहे. महाराष्ट्र व अंदमान ही लढत पिंपरी चिंचवड पॉलिग्रास मैदानावर सायंकाळी ६-३० वाजता होणार आहे.
मंगळवारी होणारे सामने
-मेजर ध्यानचंद स्टेडियम (पिंपरी चिंचवड)-सकाळी ७ वाजता-मध्यप्रदेश वि. त्रिपुरा. ८-३० वाजता-एअर इंडिया वि. पुडुचेरी. २-३० वाजता-उत्तरप्रदेश वि. मुंबई. ४ वाजता-महाराष्ट्र वि. अंदमान व निकोबार. शिवछत्रपती क्रीडानगरी-सकाळी ७ वाजता-रेल्वे वि. जम्मू व काश्मीर. २-३० वाजता-भोपाळ वि. सशस्त्र सीमा दल. ४ वाजता-चंडीगढ वि. राजस्थान.