महाराष्ट्राने पराभवाची मालिका कायम ठेवीत येथे रविवारी वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हरियानाकडून १-६ अशी हार स्वीकारली. रेल्वे, भोपाळ यांनी मात्र विजयी घोडदौड कायम राखली. शिवछत्रपती क्रीडानगरी व मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राविरुद्धच्या विजयात हरियानाकडून मनदीप अंतील याने दोन गोल करीत महत्त्वाचा वाटा उचलला. रणजितसिंग, जितेंदरसिंग, युधवीरसिंग व धरमेंदरसिंग यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. महाराष्ट्राचा एकमेव गोल विक्रम यादव याने नोंदविला. रेल्वे संघाने चौथा विजय नोंदविताना नामधारी इलेव्हनची विजयी मालिका खंडित केली. त्यांनी हा सामना ५-२ असा जिंकला. त्या वेळी त्यांचा कर्णधार संजय वीर याने दोन गोल केले.
चुरशीने झालेल्या लढतीत पुडुचेरी संघाने छत्तीसगड संघाला ५-५ असे बरोबरीत रोखले. भोपाळने जम्मू व काश्मीर संघावर ६-२ अशी मात केली. त्या वेळी विजयी संघाकडून ओसाफ उर रहेमान याने दोन गोल केले. एअर इंडियाने आव्हान राखताना मध्यप्रदेशला १०-१ अशी धूळ चारली. त्या वेळी त्यांच्याकडून विक्रम पिल्ले व जोगासिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
सोमवारी होणारे सामने- मेजर ध्यानचंद स्टेडियम-सकाळी ७ वाजता-संयुक्त विद्यापीठ वि. गुजरात. ८-३० वाजता- कर्नाटक वि. गोवा. दुपारी २-३० वाजता-पंजाब वि.अरुणाचल प्रदेश. ४ वाजता-झारखंड वि.लेखापाल नियंत्रक इलेव्हन.
शिवछत्रपती क्रीडानगरी- सकाळी ७ वाजता-ओरिसा वि. हिमाचलप्रदेश, दुपारी २-३० वाजता-मणिपूर वि. उत्तराखंड. दुपारी ४ वाजता-सेनादल वि. बिहार.