Shafali Verma Player of the Match: संधी कधीही तुमचा दरवाजा ठोठावू शकते, तुम्ही फक्त त्यासाठी तयार असले पाहिजे, अशी म्हण प्रसिद्ध आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू शफाली वर्मासाठी ही म्हण खरी ठरलीये. डीवाय पाटील स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघातही स्थान न मिळालेल्या शफाली वर्माला खेळण्याची संधी मिळाली. सलामीवीर फलंदाज प्रतीका रावलला दुखापतीमुळे अचानक बाहेर पडावे लागले आणि शफाली वर्माची संघात एंट्री झाली. नुसतीच एंट्री नाही तर २०२५ च्या विश्वचषकाच्या विजयात तिने सिंहाचा वाटा उचलला आणि तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविले गेले.
देवाने काहीतरी चांगले करण्यासाठी मला पाठवले
महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अखेरच्या साखळी लढतीत बांगलादेशविरुद्ध क्षेत्ररक्षणादरम्यान प्रतिका रावल सीमारेषेवर चौकार अडवताना अचानक दुखापतग्रस्त झाली. गुडघा आणि घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला उर्वरित स्पर्धेला मुकावे लागले. विश्वचषकात एकही सामना न खेळलेल्या शफाली वर्माला संघात स्थान मिळाले.
शफालीला तडकाफडकी बोलवून घेण्यात आले, त्यावेळी ती राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धेत हरियाणाचे नेतृत्व करत होती. तिने सूरतहून त्वरित नवी मुंबई गाठले आणि दोन दिवस कसून सराव केल्यानंतर ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी सज्ज झाली होती. “देवाने काहीतरी चांगले काम करण्यासाठी मला इथे पाठवले आहे. या संधीसाठी मी पूर्णपणे तयार आहे”, अशी प्रतिक्रिया शफालीने त्यावेळी दिली होती.
अंतिम सामन्यात विक्रमी कामगिरी
नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २९९ धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून सलामीवीर शफाली वर्माने सर्वाधिक ८७ धावांची मोठी खेळी केली. तर स्मृती मानधनासह तिने १०४ धावांची भागीदारीही रचली आणि भारताच्या फायनलमधील या धावसंख्येत मोठी भूमिका बजावली. दरम्यान गोलंदाजीतही विकेट्सची भारताला प्रतिक्षा असताना हरमनप्रीतने मोठा डाव खेळला आणि टीम इंडियासाठी २ विकेट्स मिळवल्या.
हरमनने २१ वे षटक ऑफस्पिनर शफाली वर्माला गोलंदाजी दिली. पहिला चेंडू निर्धाव राहिल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर शफालीने सुने लुसला झेलबाद केले. शफाली वर्माला यानंतर २२व्या षटकात पुन्हा गोलंदाजी सोपवली. यावेळेस तिने पहिल्याच चेंडूवर आफ्रिकेची महत्त्वाची फलंदाज मारिजान कॅपची विकेट मिळाली. या षटकात तिने फक्त १ धाव देत विकेट घेतली.
शेफाली विश्वचषक अंतिम सामन्याच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारी सर्वात तरुण फलंदाज (पुरुष किंवा महिला) ठरली. तिने केवळ २१ वर्षे आणि २७८ दिवस वय असताना हा विश्वविक्रम केला. इतकंच नाही तर, विश्वचषक फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारी ती तिसरी भारतीय सलामीवीर ठरली. २००३ च्या पुरुष विश्वचषकात वीरेंद्र सेहवागने पहिलं अर्धशतक झळकावलं होता. त्यानंतर, २०१७ च्या महिला विश्वचषकात पूनम राऊतनेही अर्धशतक झळकावलं. आता शफालीदेखील या यादीत सामील झाली आहे.
