Shahid Afridi Comment on Rahul Gandhi: पाकिस्तानचा क्रिकेट संघ रविवारी दुबईच्या मैदानावर भारतीय संघाकडून गारद झाल्यानंतर आता पाकिस्तानची माजी खेळाडू मैदानात उतरले आहेत. भारताकडून झालेला पराभव आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने हस्तांदोलन न करण्याची जी कृती केली, ती पाकिस्तानच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळेच अनेक खेळाडू आता भारताविरोधात गरळ ओकत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू, कर्णधार शाहिद आफ्रिदीने एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत भारताला इस्रायलची उपमा देऊन गरळ ओकली आहे. तसेच राहुल गांधींचाही उल्लेख केला आहे.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याचे टाळले. या कृतीतून पहलगाम हल्ल्याचा निषेध आणि बळींना श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला, असे उत्तर भारतीय संघाने दिले. यानंतर पाकिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी भारताविरोधात गरळ ओकण्यात अग्रणी राहिला आहे. त्याच्याकडून आजवर अनेकदा भारताविरोधात विधाने करण्यात आली आहेत. यावेळी त्याने भारताची तुलना चक्क इस्रायल आणि गाझा संघर्षाशी केली. तसेच भारताची सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते नकारात्मक विचारांचे लोक असून राहुल गांधी मात्र सकारात्मक विचारांचे आहेत, असे तो म्हणाला.

भारत सरकारवर टीका

पाकिस्तानच्या समा वृत्तवाहिनीवरील चर्चेत सहभागी झालेला असताना आफ्रिदीने भारताविरोधात विधान केले. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. यात आफ्रिदी म्हणतो, “स्वतःला सत्तेत ठेवण्यासाठी भारतातील विद्यमान सरकारकडून वारंवार धार्मिक मुद्दे पुढे केले जातात. ही खूप वाईट विचारसरणी आहे. यांचे सरकार जोपर्यंत आहे, तोपर्यंत अशीच विचारसरणी राहणार.”

राहुल गांधींचे केले कौतुक

शाहिद आफ्रिदीने विद्यमान केंद्र सरकारवर टीका करत असताना राहुल गांधी चांगले असल्याचे म्हटले. तो म्हणाला, “भारतात सर्वच वाईट आहेत, असे नाही. राहुल गांधींसारखे काही चांगले लोकही आहेत. राहुल गांधी सकारात्मक विचारांचे असून संवादाच्या माध्यमातून ते जगाबरोबर एकत्र येऊ इच्छितात. पण यांच्या लोकांनी सुधारायला हवे. एक इस्रायल पुरेसा नाही का? की तुम्ही दुसरा इस्रायल बनू पाहत आहात?”