भारत आणि पाकिस्तान यांच्यात २० जुलै रोजी वर्ल्ड चॅम्पियनशिप लीगमध्ये २०२५ मध्ये सामना खेळवला जाणार होता. पण युवराज सिंगच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघातील खेळाडूंना पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून सामन्यातून माघार घेतली आणि परिणामी भारत-पाकिस्ता सामना रद्द करावा लागला. भारताच्या खेळाडूंनी सामना खेळण्यापासून नकार दिल्याने पाकिस्तानचा खेळाडी शाहीद आफ्रिदी चांगलाच संतापला आहे. सामना रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया देतानाचा त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
हरभजन सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, शिखर धवन, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांसारख्या इंडिया चॅम्पियन्सच्या खेळाडूंनी WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली होती, म्हणजेच त्यांनी खेळण्यास नकार दिला होता. आता जर १५ पैकी ५-६ खेळाडू खेळले नाहीत, तर प्लेइंग इलेव्हन कशी तयार होणार? परिणामी, आयोजकांना सामना रद्द करावा लागला. भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर, पाकिस्तान चॅम्पियन्सचा कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही त्यावर प्रतिक्रिया दिली.
शाहिद आफ्रिदीने शेवटच्या क्षणी सामना रद्द झाल्याचा निषेध केला. भारतीय खेळाडूंनी त्याच्याविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने त्याला खूप धक्का बसला होता. शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “आम्ही WCL मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत आणि माझ्या मते क्रिकेट हे राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. खेळाडू हा त्याच्या देशाचा चांगला सदिच्छादूत असावा, त्याच्यामुळे देशवासीयांची मान खाली जायला नको. जर भारताला आमच्याविरुद्ध खेळायचं नव्हतं, तर त्यांनी इथे येण्याआधीच नकार द्यायला हवा होता. पण, भारतीय खेळाडू केवळ आलेच नाहीत तर सरावही केला आणि नंतर अचानक खेळण्यास नकार दिला.”
वर्ल्ड चॅम्पियन लीगमध्ये २० जुलै रोजी बर्मिंगहम येथे भारत आणि पाकिस्तान संघांमधील सामना होणार होता. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देण्यामागे शाहिद आफ्रिदी देखील कारणीभूत आहे. कारण पहलगाम हल्ल्यादरम्यान हा पाकिस्तानी क्रिकेटपटू त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होता.
भारताविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर, पाकिस्तान चॅम्पियन्स संघाच्या मालकाने सांगितलं की, त्यांना पूर्ण २ गुण मिळाल्याचा आनंद आहे आणि संघ याचा हकदार आहे. त्यांनी सांगितलं की, स्पर्धेतील पुढील सामने वेळापत्रकानुसार होतील. बाद फेरीत, भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार नाहीत याची खात्री बाळगण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास एकमेकांविरूद्ध खेळतील की नाही याचा निर्णय त्यावेळी घेतला जाईल.