Shai Hope Hit Wicket: क्रिकेटमध्ये फलंदाज झेलबाद, धावबाद, यष्टीचीत आणि पायचित होऊन बाद होतात. तर आणखी एक बाद होण्याची पद्धत म्हणजे हिट विकेट. वेस्टइंडिजचा विस्फोटक फलंदाज शाई होप आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो अनेकदा गोलंदाजांची धुलाई करताना दिसून आला आहे. सध्या तो कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना दिसून येत आहे. या स्पर्धेत खेळताना तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने बाद होऊन माघारी परतला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
असं कोण बाद होतं?
तर झाले असे की, कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील १७ वा सामना गयाना अॅमेजॉन वॉरियर्स आणि ट्रिनबागो नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गयाना अॅमेजॉन वॉरियर्स संघातील यष्टीरक्षक फलंदाज शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा गोळा करण्याच्या प्रयत्नात होता.
या सामन्यात फलंदाजी करताना गयाना अॅमेजॉन वॉरियर्स संघातील फलंदाजांनी सुरूवातीला लागोपाठ विकेट्स गमावल्या होत्या. गयाना अॅमेजॉन वॉरियर्स संघाला धावांची गरज होती. असं असताना शाई होपने आगळा वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं.
तर झाले असे की, या सामन्यातील १५ वे षटक टाकण्यासाठी हिंड्स गोलंदाजीला आला. त्यावेळी शाई होप २९ चेंडूत ३९ धावांवर फलंदाजी करत होता. या षटकातील पहिलाच चेंडू हिंड्सने ऑफ साईडच्या बाहेर टाकला, जो पंचांनी वाईड दिला असता. या चेंडूवर होपने रिव्हर्स फटका मारून थर्ड मॅनच्या वरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याने जोरात बॅट फिरवली. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही. पण ही बॅट जाऊन यष्टीला धडकली, त्यामुळे त्याला हिटविकेट होऊन माघारी परतावं लागलं. या विकेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गयाना अॅमेजॉन वॉरियर्स संघाने २० षटकांअखेर ९ गडी बाद १६३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ट्रिनबागो नाईट रायडर्स संघातील फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. यासह दिलेलं आव्हान १७.२ षटकात पूर्ण केलं. यासह हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.