आयपीएलच्या सहाव्या हंगामामध्ये ‘स्पॉट-फिक्सिंग’चा डाग लागलेल्या राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनची नियुक्ती करण्यात आली आहे, तर संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आयपीएलमधून खेळाडूच्या भूमिकेतून निवत्ती घेतली असली, तरी यापुढे तो संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. २००८ साली राजस्थानने पहिल्या आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली होती, याचीच पुनरावृत्ती करण्याचा मानस यावेळी वॉटसनने बोलून दाखवला. गेल्या वर्षी द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आयपीएलमध्ये गेल्या वर्षी द्रविडच्या कप्तानीखाली संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
‘‘राजस्थान रॉयलसारख्या नावाजलेल्या संघाचे कर्णधारपद भूषवणे, हा माझा सन्मान आहे. या संघाने नेहमीच मला बऱ्याच संधी दिल्या आहेत. आता दिलेल्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी माझ्यावर असेल. २००८ साली आम्ही आयपीएलचे जेतेपद पटकावले होते, त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा माझा मानस असेल. गेल्या वर्षी आमची कामगिरी चांगली झाली असली, तरी आम्हाला जेतेपद पटकावता आले नव्हते, पण यावर्षी मात्र जेतेपद पटकावण्याचा निर्धार आम्ही केला आहे.’’ असे वॉटसन म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘शेन वॉर्न आणि राहुल द्रविड या दोघांनीही माझ्यावर आतापर्यंत विश्वास दाखवला होता. या दोघांनी ज्या संधी मला दिल्या, त्यामुळे माझे क्रिकेट अधिकाधिक सुधारत गेले. संघ आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे, ही माझ्यावर फार मोठी जबाबदारी असेल. कारण संघ आणि चाहत्यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला आहे आणि या विश्वासाला तडा जाणार नाही, याची पुरेपूर काळजी मी घेईन.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2014 रोजी प्रकाशित
शेन वॉटसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार
आयपीएलच्या सहाव्या हंगामामध्ये ‘स्पॉट-फिक्सिंग’चा डाग लागलेल्या राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनची नियुक्ती करण्यात आली आहे,

First published on: 11-03-2014 at 01:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shane watson to lead rajasthan royals in indian premier league