ग्वांगझो (कोरिया) : भारताच्या १८ वर्षीय शीतल देवी आणि तोमन कुमार यांनी शनिवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना पॅरा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने एकाच दिवशी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळविली.

जम्मू-काश्मीरची शीतल पायाने लक्ष्यभेद करते. त्यामुळे हात नसूनही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली तिरंदाज ठरली आहे. यापूर्वी २०२२ मध्ये अमेरिकेच्या मॅट स्टुट्झमन याने पुरुष विभागात सुवर्णपदक मिळविले होते. मॅटही हात नसल्याने पायानेच वेध घेतो.

शीतलने अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या तुर्कीयेच्या ओझनूर क्युर गिर्डी हिचा १४६-१४३ असा पराभव केला. त्यापूर्वी शीतलने तोमन कुमारच्या साथीत ग्रेट ब्रिटनच्या ग्रिनहॅम आणि नॅथन मॅकक्वीन जोडीचा १५२-१४९ असा पराभव करून मिश्र गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्याचबरोबर महिला सांघिक प्रकारात शीतल आणि सरिता या भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तुर्कीये संघाने १५२-१४८ अशा फरकाने विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले.

महिलांची अंतिम लढत चुरशीची झाली. पहिला सेट २९-२९ असा बरोबरीत राहिला होता. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये शीतलने तीनही वेळा १० गुणांची कमाई केली. ओनझूर मात्र अपयशी ठरली. यामुळे दुसऱ्या सेटला शीतलने ५९-५६ अशी आघाडी मिळवली. तिसऱ्या सेटला शीतलने अचूकता कायम राखत आघाडी ८८-८५ अशी वाढवली. चौथा सेट मात्र ओझनूरने २९-२८ असा जिंकून पिछाडी ११६-११४ अशी भरून काढली. मात्र, अखेरचा पाचव्या सेटला शीतलने तीन वेळा अचूक १० गुणांचा वेध घेऊन सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. या दोघींमध्ये २०२३च्या जागतिक स्पर्धेतही सुवर्ण लढत झाली होती. तेव्हा ओझनूरने १४०-१३८ असा विजय मिळविला होता.

पुरुष विभागात सुवर्ण, रौप्य भारताचेच

पुरुष विभागात राकेश आणि तोमन यांच्यातच अंतिम लढत असल्यामुळे सुवर्णपदक भारताचेच होते. दोन भारतीयांमधील लढतीत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या राकेशला धनुष्यातील तांत्रिक बिघाडामुळे माघार घ्यावी लागली. यामुळे तोमन पदार्पणाच्या स्पर्धेतच सुवर्णपदकाचा मानकरी ठरली. कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या श्यामसुंदर स्वामीला ब्रिटनच्या नॅथन मॅकक्वीनकडून १४१-१४८ असा पराभव पत्करावा लागला.