Sheetal Devi Won Gold: भारताची तिरंदाज शीतल देवीने शनिवारी दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू येथे झालेल्या पॅरा विश्व तिरंदाज जेतेपद स्पर्धेत शानदार कामगिरी करत विश्वजेतेपद पटकावले. वैयक्तिक तिरंदाज प्रकारात शीतल देवीने तुर्कीयेच्या अव्वल क्रमांकाच्या ओझनूर क्युर गिर्डीचा १४६-१४३ ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. पॅरा विश्व तिरंदाज जेतेपद स्पर्धेत दोन्ही हात खांद्यापासून नसलेली शीतल देवी ही एकमेव खेळाडू आहे. आपल्या पायांचा आणि हनुवटीचा वापर करून ती धनुष्यातून बाण सोडते.

या स्पर्धेत शीतलने हे तिसरे पदक जिंकले आहे. यापूर्वी तिने तोमन कुमारबरोबर मिश्र संघात कांस्यपदक जिंकले होते. या दोघांनी ग्रेट ब्रिटनच्या जोडी ग्रिनहॅम आणि नॉथन मॅकक्वीन यांना नमवले. सांघिक महिला ओपन स्पर्धेत शीतल आणि सरिता यांचा अंतिम फेरीत तुर्कीयेकडून पराभव स्वीकारावा लागला. तरीही त्यांनी रौप्यपदक जिंकले.

सांघिक महिला ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शीतल आणि सरिता यांनी जोरदार सुरुवात केली होती. परंतु अखेर त्यांना तुर्कीयेच्या ओझनूर क्युर गिर्डी आणि बुर्सा फातमा यांच्या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला. तुर्कीयेच्या जोडीने १४८-१५२ असा विजय मिळवला. पहिल्या राऊंडमध्ये भारतीय तिरंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. पहिल्या चार बाणांमध्ये त्यांनी तीन वेळा १० गुण मिळवत ३८-३७ ने सेट संपवला होता. परंतु दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये तुर्कीयेच्या तिरंदाजांनी पुनरागमन करत भारतीय जोडीचा पराभव केला.

सांघिक सामन्यात पराभव होऊनही शीतल देवीने तिच्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. मानसिक कणखरता आणि तांत्रिक कौशल्य दाखवत तुर्कीयेच्या ओझनूर क्युर गिर्डीचा वैयक्तिक स्पर्धेत पराभव केला.

जन्मपासून दुर्मिळ आजार

शीतल देवीचा जन्म १० जानेवारी २००७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमधील लोईधर गावात झाला. जन्मताच तिला फोकोमेलिया हा दुर्मिळ आजार होता. या आजारामुळे शरीर विकसित होत नाही. त्यामुळे तिचे हात पूर्णपणे तयार झाले नाहीत. आपल्या शारिरीक व्यंगाकडे दुर्लक्ष करून शीतल देवीने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.

२०२१ मध्ये जम्मू काश्मीरच्या किश्तवार येथे भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या युवा कार्यक्रमात शीतलमधील आत्मविश्वासाची जाणीव लष्कराच्या प्रशिक्षकांना झाली. त्यानंतर पॅरा तिरंदाजीतील शीतलचा प्रशिक्षणाचा प्रवास सुरू झाला.