Asia Cup Shoaib Akhtar on Pakistan coach: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ मध्ये सलग दोनदा पाकिस्तानचा पराभव केला. भारताने अलीकडेच सुपर फोर सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानमधील वातावरण अत्यंत तणावपूर्ण आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनीच संघातील खेळाडू, कर्णधार आणि कोचवर ताशेरे ओढले आहेत. शोएब अख्तर कर्णधारानंतर आता कोचला सुनावलं आहे.
शोएब अख्तरने पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन यांच्या कोचिंगवर प्रश्न उपस्थित केला. संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये हुसैन तलतला सामील करण्यामागचं त्याने कारण विचारलं. कारण हुसैनने ११ चेंडूत १० धावा केल्या आणि पाकिस्तानचा डाव स्लो डाऊन केला. ज्यामुळे पाकिस्तान जिथे २०० अधिक धावा करू शकला असता तिथे संघ ५ बाद १७१ धावाच करू शकला.
शोएब म्हणाला, “प्रशिक्षकाला प्रश्न विचारले गेले पाहिजे. त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? हे पूर्णपणे मूर्खपणाने केलेलं कोचिंग आणि चुकीची संघ निवड आहे. माझ्या आकलनापलीकडे आहे. मला वाटतंय १५ वर्षे क्रिकेट खेळून मलाच काही समजत नाहीये, मीच फ्रॉड आहे.”
अख्तर म्हणाला, “गेल्या ५-६ सामन्यांपासून आम्ही योग्य संघ खेळवा हेच सांगत आहोत. एका महत्त्वाच्या सामन्यात, तुम्ही हुसेन तलतला खेळवण्याचा विचार कराल का? तुम्ही तो कसा विचार केला? त्याची उपयुक्तता काय आहे? मला सांगा.”
पीसीबीचं अध्यक्षपद दिले तर काय बदल करशील, अख्तर म्हणाला…
गेम ऑन है या कार्यक्रमात बोलताना शोएब अख्तरला शोएब मलिकने विचारलं की, तो जर पीसीबीचा अक्ष्यक्ष झाला तर तो काय बदल करेल? यावर अख्तर म्हणाला, “सर्वात आधी तर मला पीसीबी कधीच ही संधी देणार नाही, कारण त्यांना माहित आहे मी जिथे गरज आहे तिथे चांगले निर्णय घेत बदल करेन. मी नाही सांगत आहे मला संधी द्या. माझी टीमवर्कवर विश्वास आहे. माझा लॉजिकवर विश्वास आहे, मी एकत्र काम करण्याला प्राधान्य देतो.”